शिरोळचा अटकेपार झेंडा
By Admin | Updated: July 31, 2014 00:51 IST2014-07-31T00:49:14+5:302014-07-31T00:51:42+5:30
विविध घटनांमुळे चर्चेत : 'दत्त'ची निवडणूक बिनविरोध, खेळाडूंचे यश

शिरोळचा अटकेपार झेंडा
संदीप बावचे / जयसिंगपूर
राष्ट्रकुल स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील खेळाडूंनी दाखवलेली चमक, कारखान्याच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध झालेली ‘दत्त’ची निवडणूक, आगामी विधानसभेसाठी कॉँग्रेसकडून उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी केलेली मागणी, कर्जमाफीवरून ‘स्वाभिमानी’ व ‘राष्ट्रवादी’ यांच्यात रंगलेला कलगीतुरा, तर शिवसेनेने राबविलेली ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ मोहीम, अशा घटनांमुळे शिरोळ तालुका पुन्हा एकदा चर्चेत राहिला.
ग्लासगो (स्कॉटलंड) येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील चार खेळाडूंनी अटकेपार झेंडा लावला. यामध्ये घालवाडच्या राही सरनोबत हिने नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले, तर वेटलिफ्टिंग प्रकारात हॅट्ट्रिक साधत कुरुंदवाडच्या गणेश माळी, ओंकार ओतारी व चंद्रकांत माळी यांनी भारताला कांस्यपदक मिळवून दिले. या खेळाडूंनी अभिमानास्पद कामगिरी करून इतिहास घडविला आहे. त्यांनी तालुक्याचे नाव सातासमुद्रापार चमकाविले असून, खेळाडूंच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कारखान्याच्या ४२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच श्री दत्त साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करून आ. डॉ. सा. रे. पाटील यांनी आपल्या कौशल्याची छाप पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी देखील त्यांनी मुत्सद्दी खेळी करून आपला वेगळा ठसा उमटविला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे नुकताच कॉँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. पश्चिम महाराष्ट्राचे पक्षनिरीक्षक रमाकांत खलप यांच्याकडे कॉँग्रेसमधील अनेकांनी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत इच्छा व्यक्त केली. मेळाव्यात कॉँग्रेसचा उमेदवार ताकदवान असेल, अशीही घोषणा खलप यांनी यावेळी केली असली तरी आ. सा. रे. पाटील हे निवडणूक लढविणार का, याबाबत सध्या प्रश्नचिन्ह आहे. मात्र, आ. सा. रे. पाटील सांगतील तोच उमेदवार विधानसभा निवडणुकीत असणार आहे. कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रवादीतील कलगीतुरा चांगलाच रंगला. लोकसभेत खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत चुकीचे विधान केल्याच्या निषेधार्थ खा. शेट्टी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी दिला होता, तर खा. शेट्टी यांनी तथाकथित कर्जबुडव्या नेत्यांचे बिंग फुटेल, या भीतीपोटी खोटी पत्रकबाजी सुरू असल्याची टीका केली होती.
खा. शेट्टींच्या निवासस्थानावर मोर्चा काढणारे सध्या गायब झाले असून, ‘स्वाभिमानी’च्या गोटातही शांतता पसरली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेने शिरोळ तालुक्यात ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत सदस्य नोंदणी अभियान राबविले. मात्र, या अभियानात तालुक्यातून किती सदस्यांची नोंदणी झाली, याची माहिती मात्र शिवसैनिकांना देता आली नाही. एकूणच अशा अनेकविध घटनांमुळे शिरोळ तालुका चांगलाच चर्चेत राहिला.