जक्कनहट्टी गाव समस्यांच्या विळख्यात
By Admin | Updated: November 7, 2014 23:31 IST2014-11-07T23:27:02+5:302014-11-07T23:31:34+5:30
शासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

जक्कनहट्टी गाव समस्यांच्या विळख्यात
संजय पाटील - कोवाड -कोवाडपासून केवळ ४ कि.मी. अंतरावर असणारे जक्कनहट्टी (ता. चंदगड) गाव विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. आजूबाजूच्या गावांना जोडणारा येथील पक्का रस्ता गायबच आहे. शिक्षण, आरोग्य, रेशन, आदी सुविधांसाठी येथील ग्रामस्थांना कित्येक किलो मीटरची पायपीट करावी लागत आहे. शासनासह या गावाकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष असल्याने हे गाव विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. खरंच या गावाचा कायापालट होणार का ? की हे प्रश्न असेच राहणार याची काळजी ग्रामस्थांना आहे.
जवळपास ६०० लोकसंख्या असणारे हे गाव मलतवाडीच्या उत्तरेला वसले आहे. गावामध्ये केवळ पिण्याच्या पाण्याची सोय वगळता इतर कोणत्याही सुविधा नाहीत. पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे.
शासन व शेतकऱ्यांच्या वादात येथील रस्ता अर्धवट पडला आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये येथील विविध प्रश्नांवर आवाज उठवून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र, आश्वासनानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.
ग्रामस्थांना बँक व्यवहारासाठी कोवाड किंवा म्हाळेवाडीला जावे लागते. दूरध्वनी केंद्र कोवाड आहे. गाव ग्रामीण भागात असूनही बिल मात्र शहरी येते. विकास सेवा सोसायटीच्या व्यवहारासाठी मलतवाडीला जावे लागते. हे गाव कोवाडकडून जवळ असूनही आरोग्य केंद्र मात्र माणगावशी संलग्नित आहे.
तलाठी कामासाठी कोवाड, माध्यमिक शिक्षणासाठी मलतवाडी, निट्टूर, सांबरे येथे जावे लागते. ग्रामपंचायत घुल्लेवाडी असल्याने विविध दाखल्यांसाठी घुल्लेवाडीला जावे लागते. एकाच गावातील लोकांना आपल्या कामासाठी सहा गावांशी दररोज संपर्क ठेवावा लागतो ते ही चालतच. कारण येथे रस्ताच नसल्याने कोणतेही वडाप किंवा एस.टी. बस जात नाही. एखाद्या अत्यवस्थ रूग्णाला हॉस्पिटलला न्यायचे असेल, तर ‘मरण बरे, पण प्रवास नको’, अशी अवस्था रूग्णांची व नातेवाइकांची होते. या सर्व प्रकाराने येथील ग्रामस्थ वैतागला आहे.
स्वातंत्र्याच्या साठीनंतरही आपण पारतंत्र्यात आहोत की काय, असे आम्हाला वाटत आहे. विविध राजकीय पक्षांच्या पाया पडूनही गावाचा विकास खुंटला आहे. विविध सोयी नसल्याने येथील मुले शिक्षण अर्धवट सोडून शेतीकडे वळत आहेत. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून जक्कनहट्टी गावाला नवसंजीवनी द्यावी.
- आनंदा बाळेकुंद्री,
जक्कनहट्टी रहिवासी