युवकांनी इतिहास जपावा : आडके

By Admin | Updated: January 13, 2015 00:06 IST2015-01-12T23:57:56+5:302015-01-13T00:06:14+5:30

‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे व्याख्यान : विवेकानंद जयंती व युवक दिनानिमित्त आयोजन

Youths should have history: Badge | युवकांनी इतिहास जपावा : आडके

युवकांनी इतिहास जपावा : आडके

कोल्हापूर : समाजाची आपल्यावर काही तरी जबाबदारी आहे, ही भावना धूसर होत चालली आहे. हे समाजासाठी अत्यंत घातक आहे. युवकांनी आपला इतिहास समजून घेतला पाहिजे. आपल्या इतिहासाचा आपण अभिमान बाळगावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य उभे केले ते फक्त चारित्र्यवान व निष्ठावान व्यक्तींमुळेच. युवकांनी राष्ट्रभक्ती जपून ध्येय निश्चित करून वाटचाल करावी, असे आवाहन ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी केले.
महावीर महाविद्यालयातील अ‍ॅम्फी थिएटरमध्ये ‘लोकमत’ युवा नेक्स्ट व महावीर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद जयंती व युवक दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ‘राष्ट्रीय चरित्र्य व आजचा युवक’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एम. ए. मायगोंडा होते. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
डॉ. अमर आडके म्हणाले, ज्यांच्या मनात विधायक विचार असतात तो तरुण होय. युवकांनी फक्त ‘जय भवानी, जय शिवाजी’ या पलीकडे जाऊन शिवचरित्र समजून घेतले पाहिजे. शिवचरित्रामधून ऐकीची भावना जागृत होते. संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. या सर्व गोष्टींची युवा पिढीला गरज आहे. युवा पिढीने हा इतिहास जाणून घेण्यासाठी गडकोट फिरले पाहिजे. त्याच्या इतिहासाची माहिती करून घेतली पाहिजे.
‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, युवकांमध्ये वाचनाची आवड कमी होत चालली आहे. वाचनाची आवड कमी झाल्याने लिहिण्याची सवयही मोडली आहे. संवादाचा वेग वाढलाय. मात्र, घराघरांतील संवाद तुटला आहे. विद्यार्थ्यांनी अधिक व्यापक होऊन वाचन, मनन आणि चिंतन या गोष्टी करणे गरजेचे आहे. बारीक-सारीक गोष्टींतून आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो. यासाठी प्रथम स्वत:ला शिस्त लावली पाहिजे.
डॉ. एम. ए. मायगोंडा म्हणाले, तरुणांना चिंतन, मनन काय करायचे हेच माहिती नाही असे दिसते. या गोष्टी युवकांना आपल्या इतिहासामधून कळतील. थोर व्यक्तींची चरित्रे वाचली पाहिजेत. त्यांचा आदर्श डोळ््यासमोर ठेवला पाहिजे.
डॉ. अरुण पाटील यांनी प्रास्ताविक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. उत्तरा कुलकर्णी यांनी करून दिला. याप्रसंगी ‘लोकमत’चे इव्हेंट मॅनेजर दीपक मनाठकर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. राहुल सूर्यवंशी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शुभांगी जोशी व योगेश काशीद यांनी केले.


कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयात सोमवारी ‘लोकमत युवा नेक्स्ट’ व महावीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद जयंती व युवक दिनानिमित्त आयोजित ‘राष्ट्रीय चरित्र्य व आजचा युवक’ या विषयावर बोलताना डॉ. अमर आडके. डावीकडून दीपक मनाठकर, प्रभारी प्राचार्य डॉ. एम. ए. मायगोंडा, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, डॉ. अरुण पाटील. समोर उपस्थित विद्यार्थी.

Web Title: Youths should have history: Badge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.