युवा! वाह...व्वा!

By Admin | Updated: September 4, 2015 00:25 IST2015-09-04T00:25:18+5:302015-09-04T00:25:18+5:30

जिल्हास्तरीय महोत्सव : विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सळसळता उत्साह

Youth! Wow ... wow! | युवा! वाह...व्वा!

युवा! वाह...व्वा!

कोल्हापूर : डोलायला लावलेले लोकनृत्य, लोकवाद्यवृंद, सूरमयी सफर घडविणारे सुगम संगीत, भ्रष्टाचार व महागाईबाबतच्या सरकारच्या धोरणांवर मिश्कीलपणे टिप्पणी करणारी लघुनाटिका व युवक-युवतींचा सळसळता उत्साह, अशा जल्लोषी वातावरणात गुरुवारी ३५ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात दिवसभर तरुणाईने धुमशान केली. लोकनृत्य, लोककला संगीत व वाद्यवृंदावर तरुणाईची पावले थिरकली. ‘थ्री चिअर्स फॉर...’, ‘हिप हिप हुर्ये...’ अशा आरोळ्या आणि टाळ्या-शिट्ट्यांनी स्पर्धेची ठिकाणे दणाणून गेली. महावीर महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या महोत्सवाला स्पर्धक आणि समर्थक अशा दोन्ही भूमिकेत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गर्दी केली होती.शिवाजी विद्यापीठ आणि महावीर महाविद्यालयातर्फे आयोजित महोत्सवात उद्घाटन वगळता सकाळच्या सत्रातील स्पर्धा नियोजित वेळेत सुरू झाल्या. विविध ठिकाणी एकाचवेळी स्पर्धा सुरू करण्यासाठी संयोजकांची धावपळ सुरू होती. विशेष म्हणजे स्पर्धेचे ठिकाण, वेळेची माहिती देण्यासाठी संयोजकांनी स्वयंसेवक कार्यान्वित ठेवल्याने स्पर्धकांची तारांबळ उडाली नाही. कसबेकर हॉलच्या तळघरात बासरी, व्हायोलीन, तबला, सूरपेटीच्या साथीने सुगम गायनातून सूरमयी सफर घडली. दादासाहेब मगदूम हायस्कूलमागील मैदानावर पथनाट्ये झाली. यात २३ संघांनी ज्वलंत प्रश्न मांडले. आचार्य विद्यानंद सभागृहातील एकांकिकांनी मानवी जीवनातील भावनिक विषय सशक्तपणे सादरीकरण करत विचार करायला भाग पाडले. मूकनाट्यातून आतंकवाद, पर्यावरण रक्षण, महिला सुरक्षा, आदींबाबत प्रबोधन करण्यात आले. हिंदी, इंग्रजी आणि मराठीतील वक्तृत्व स्पर्धेत सामाजिक समस्यांवर स्पर्धकांनी प्रकाशझोत टाकला. कसबेकर हॉलमधील लघुनाटिकेत स्पर्धकांनी पर्यावरण, लेक वाचवा, सोशल मीडियाचा योग्य वापर, आदी विषयांबाबत प्रबोधन केले. यानंतर भारतीय समूहगीतांनी देशभक्ती जागविली. महोत्सवातील स्पर्धांची गती दुपारी तीननंतर वाढली. गणपतराव रोटे शिक्षण भवनासमोरील मुख्य मंच येथे चारच्या सुमारास लोकसंगीत वाद्यवृंद स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी संघांनी भारतीय पारंपरिक वाद्यांतून केलेल्या सादरीकरणाने उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना ठेका धरायला लावला. महोत्सवात सर्वाधिक गर्दी खेचणारी लोकनृत्य स्पर्धा आठच्या सुमारास सुरू झाली. यात लावणी, भांगडा, कोळीनृत्य, आदींनी उपस्थितांना डोलविले. रात्री अकरापर्यंत या स्पर्धा रंगल्या. लोककला, लोकनृत्याच्या सादरीकरणाला टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात दाद मिळत होती. महोत्सवातील सर्वच कलाप्रकारांत तरुणाईच्या कौशल्याचे दर्शन घडले. (प्रतिनिधी)

‘चिअर-अप’ अन् सेल्फी...
महोत्सवासाठी सकाळी आठ वाजल्यापासून संघ महावीर महाविद्यालयात दाखल होऊ लागले. काहीवेळातच परिसर गर्दीने फुलून गेला. विविध कला प्रकारांतील स्पर्धा, संघ आणि स्पर्धकांची तयारी, तसेच त्यांना ‘चिअर-अप’ करण्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता. महाविद्यालयाच्या कॅम्पस्मध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींचे फोटोशूट सुरू होते. तसेच ते व्हॉटस् अ‍ॅप, हाईकद्वारे शेअर करीत होते. महोत्सवात जिल्ह्यातील ५५ महाविद्यालयांमधील सुमारे १३०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. महोत्सवाच्या नेटक्या संयोजनाबाबत स्पर्धक, समर्थकांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Youth! Wow ... wow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.