कोल्हापूरच्या युवकाचा बुडून मृत्य
By Admin | Updated: November 20, 2014 00:19 IST2014-11-20T00:16:33+5:302014-11-20T00:19:41+5:30
मालवण समुद्रातील घटना : पर्यटनासाठी गेले असता काळाचा घालाू

कोल्हापूरच्या युवकाचा बुडून मृत्य
मालवण : मालवण तोंडवळी येथे समुद्रात पोहायला उतरलेल्या संतोष धोंडिराम भोसले (वय ३७, रा. सरदार तालमी- जवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथून आज दुपारी नितीन मुसळे, उमेश जावडेकर, गणेश संकपाळ, महेश गांजवे व संतोष भोसले असे पाच मित्र पर्यटनासाठी मालवण येथे आले होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान तोंडवळी येथे समुद्रकिनारी आले असता या मित्रांपैकी संतोष भोसले हा समुद्रात पोहण्यास उतरला. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तोे खोल समुद्रात ओढला गेला. यातच त्याचा मृत्यू झाला. भोसले हा समुद्रात दिसेनासा झाल्याचे समजताच त्याच्या मित्रांनी धावाधाव करून स्थानिक लोकांना याबाबत कल्पना दिली. स्थानिक लोक जमा होईपर्यंत पाण्याच्या लाटांबरोबर भोसले याचा मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर आला. याबाबत मालवण पोलिसांत माहिती देण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)
शिवाजी पेठ परिसरात हळहळ
मनमिळाऊ स्वभावाच्या संतोष भोसले यांच्या मृत्यूने शिवाजी पेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भोसले हे मित्राचे काम असल्याने बुधवारी सकाळी त्याच्या मारुती व्हॅनमधून इतर पाच मित्रांसमवेत मालवणला गेले होते. दुपारी त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात आई, बहिणी, पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहे. वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. भोसले यांचे निवृत्ती चौक परिसरात सलूनचे दुकान आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरच्या लोकांना सांगण्यात आली नव्हती.