पतंग उडतोय तुमचा; जीव जातोय मात्र आमचा !
By Admin | Updated: November 10, 2014 00:44 IST2014-11-10T00:32:42+5:302014-11-10T00:44:53+5:30
आठवड्यात १० पक्ष्यांना जीवदान : रविवारीही वाचविला ‘धनेश’ अर्थात ‘कॉमन ग्रे हॉर्नबिल’ चा जीव

पतंग उडतोय तुमचा; जीव जातोय मात्र आमचा !
कोल्हापूर : नोव्हेंबर महिन्यामध्ये पतंग उडविण्यासाठी पोषक असे वारे वाहत असते. मात्र, पतंग उडविताना पतंगाचा मांजा दोरा आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या जिवावर बेतू लागला आहे. गेल्या आठवडाभरात विविध जातींच्या दहा पक्ष्यांवर पांजरपोळ येथे उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यात आला. हा मांजा दोरा जणू या पक्ष्यांच्या जिवावर उठू लागला आहे.
गेल्या आठवडाभरात चिमणी, कावळा, स्पॉटेड मुनिया ते आज, रविवारी धनेश या पक्ष्यांचा केवळ पतंगाचा दोरा असणाऱ्या मांजामध्ये पंख अडकून जीव जाता-जाता वाचला आहे. आज तर जयदीप जाधव यांना जुना बुधवार पेठ येथे ‘धनेश’ (कॉमन ग्रे हॉर्नबिल) पक्ष्याच्या पंखांत मांजा दोरा अडकला होता. त्यामुळे तो जखमी अवस्थेत पडला होता. त्याला जयदीप जाधव यांनी पांजरपोळ येथे उपचारासाठी आणले. त्यावर डॉ. राजकुमार बागल यांनी उपचार करून मुक्त केले. या आठवड्यात विविध जातींचे दहा पक्षी पतंगाच्या मांजा दोऱ्यामुळे जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. त्यांना पक्षिप्रेमी नागरिकांनी पांजरपोळ येथे औषधोपचारांसाठी दाखल केले होते. वेळेवर उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यात आला. मात्र, ज्यांच्यामुळे इतकी गंभीर बाब झाली, त्या पतंगप्रेमींनीही पतंग उघड्या मैदानावर उडवावेत, एवढी जरी काळजी
घेतली तरी या पक्ष्यांचा जीव
वाचेल. (प्रतिनिधी)
अशा पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी सदैव तयार
अशा पद्धतीने अपघात झालेल्या पक्ष्यांवर आम्ही उपचार करण्यासाठी सदैव तयार आहोत. मात्र, पतंगाच्या मांजापासून धोका पोहोचून हे पक्षी गंभीर जखमी होऊन मरत आहेत, ही बाब मनाला खिन्न करणारी आहे. त्यामुळे पतंग उडविणाऱ्यांनी पक्ष्यांचा जीव जाणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच अशा प्रकारे कुठेही पक्षी रस्त्यावर पडले तर त्यांच्यावर आम्ही उपचार करण्यासाठी सदैव तयार आहोत.
- डॉ. राजकुमार बागल
(पांजरपोळ संस्था, कोल्हापूर )