महिलांसह तरुणींचे जीवन असुरक्षित
By Admin | Updated: September 5, 2014 00:34 IST2014-09-05T00:31:01+5:302014-09-05T00:34:27+5:30
शहरात रोडरोमिओंचा उच्छाद : प्रतिकार करणाऱ्यांंवरच हल्ले; पोलीस मूग गिळून गप्प

महिलांसह तरुणींचे जीवन असुरक्षित
एकनाथ पाटील -कोल्हापूर --चेन स्नॅचरच्या भीतीने महिला, तरुणींचे जीवन असुरक्षित असताना आता नवीन भयावह संकटांचा त्यांना सामना करावा लागत आहे. शहरातील कॉलेज, बसस्टॉप, आॅफिस, आदी परिसरात तरुणींसह महिलांच्या छेडछाडीचे प्रकार दिवसें-दिवस वाढत आहेत. दिवसा दुचाकीवरून घरापर्यंत पाठलाग करून तरुणींच्या मनावर दडपणाचा प्रयत्न होत आहे. त्यांना प्रतिकार करणाऱ्यांंवर जीवघेणा हल्ला केला जात आहे. कायदा व्यवस्था निष्क्रिय बनली. न्यायव्यवस्थेमध्ये दाद मिळेलच याचा विश्वास नसल्याने त्या तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. रोडरोमिआेंच्या उच्छादाने शहरातील पावित्र्य नष्ट होत आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका बजावित असल्याचे भयावह चित्र शहरात दिसते.
शहरात दिवसा-ढवळ्या चेन स्नॅचरकडून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारण्याचे प्रकार वाढत असताना दुसरीकडे रोडरोमिओंचा त्रास पाचविला पूजला आहे. राजारामपुरी येथील सायबर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीला एक सराईत गुंडाला तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तरुणीच्या समोरच त्या गुंडाची पोलीस ठाण्यात धुलाई केली. त्यानंतर श्रीमती सिंग व उपअधीक्षक वैशाली माने, महाविद्यालयावरच रोडरोमिओंची धरपकड करत चोप दिला. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही केली.
अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी महिला व तरुणींसाठी महिला हेल्पलाईन सुरू केली. परंतु या पथकाचा धाक तरुणांच्या मनावर पडलेला नाही. बेफामपणे दुचाकी रस्त्यावर फिरवीत ते तरुणींसह महिलांचा पाठलाग करताना भयावह चित्र लोकांना दिसतेय. त्यांना रोखणाऱ्यावरच हल्ले करायलाही ते मागे पुढे बघत नाहीत. पंधरा दिवसांपूर्वी विवेकानंद कॉलेजमधील विद्यार्थिनीचा कळंब्यातील एका तरुणाने तिचा चक्क हात पकडून जबरदस्तीने गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. उमा टॉकीज चौकात महिलेची गाडी अडवून तरुणाने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटना शाहूपुरी व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद आहेत. पण त्यांना त्यांना समज देऊन सोडून देतात. धाक न राहिल्याने रोमिओंचे पुन्हा बेशिस्त वर्तन करू लागले आहेत.
मनोबल वाढविण्याची गरज
रोडरोमिओंच्या त्रासाने अनेक मुलींनी शाळा-कॉलेजलाच जाणे बंद केले. आज छेडछाड होऊनही एकही मुलगी तक्रार देण्यास पुढे येत नाही. त्यासाठी पोलीस प्रशासनाने मुलींचे मनोबल वाढविण्याची गरज आहे.
- वर्षा संकपाळ (गृहिणी)
तक्रारपेटीला वाली नाही
महाविद्यालयात लेडीज रूममध्ये तक्रार पेट्या बसविल्या आहेत. तरुणींनी अगदी बिनधास्तपणे छेड काढणाऱ्या तरुणाचे नाव, फोन व दुचाकी नंबर लिहून चिठ्ठी तक्रारपेटीत टाकावी, अशी सूचना पोलीस व महाविद्यालय प्रशासनाकडून केली आहे. पंधरा दिवसांतून एकदा दोन पोलीस महाविद्यालयात जाऊन तक्रार पेटी उघडतात. परंतु या पेट्या उघडण्यास पोलीस जात नसल्याचा तक्रारी आहेत.
कठोर पाऊल उचलण्याची गरज
महिला व तरुणींची असुरक्षितता वाढली. एकीकडे उच्च, आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले. परंतु स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन तसाच आहे. त्याला सामाजिक मान्यता असल्यासारखे हे तरुण वागतात. एकतर्फी प्रेम करुन तरुणींना त्रास दिला जात आहे. हे रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलावीत. - डॉ. मेघा पानसरे (अध्यक्ष : अखिल भारतीय महिला फेडरेशन )