परभणीच्या ऊसतोड तरुणीचा गडहिंग्लजमध्ये बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:38+5:302021-02-23T04:36:38+5:30

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ४ महिन्यांपूर्वी परभणीची ऊसतोड मजुरांची टोळी गडहिंग्लज परिसरात आली आहे. या टोळीतील नातेवाइकांबरोबर ...

A young woman from Parbhani drowned in Gadhinglaj | परभणीच्या ऊसतोड तरुणीचा गडहिंग्लजमध्ये बुडून मृत्यू

परभणीच्या ऊसतोड तरुणीचा गडहिंग्लजमध्ये बुडून मृत्यू

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ४ महिन्यांपूर्वी परभणीची ऊसतोड मजुरांची टोळी गडहिंग्लज परिसरात आली आहे. या टोळीतील नातेवाइकांबरोबर गौकर्णा व तिचे भाऊ विष्णू (वय २०), कैलास (वय १९) हे तिघेही आले आहेत. काही दिवसांपासून गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ कानूल येथे त्यांचे ऊसतोडणीचे काम सुरू आहे. दरम्यान, रविवार (२१) सकाळी अकराच्या सुमारास गौकर्णा त्यांच्या पालाच्या बाजूला असलेल्या एका विहिरीवर स्वयंपाकासाठी पाणी आणायला गेली होती. त्यावेळी तोल जाऊन ती पाण्यात पडली. बराच वेळ झाला तरी ती परत न आल्यामुळे शेजारी उसाची गाडी भरणाऱ्या तिच्या नातेवाइकांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी ती पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढून तिला उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, नाका-तोंडात पाणी जाऊन श्वास गुदमरल्याने तिची प्राणज्योत मालवली. गोकर्णाचा भाऊ विष्णू याच्या वर्दीवरून पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

-------------------------------

* घागर...अन् शंकेची पाल..!

गौकर्णा ही प्लास्टिकची घागर घेऊन पाण्याला गेली होती. घागर भरत असतानाच तोल गेल्यामुळे ती पाण्यात पडली. घाबरून तिने घागर घट्ट पकडून ठेवली होती. त्यामुळे घागरीसह ती पाण्यात तरंगत होती. घागर विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसल्यामुळेच नातेवाइकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी तातडीने तिला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे गुदमरून तिचा मृत्यू झाला.

----------------------------

सावकारी कर्जामुळेच वेळ

सावकारी कर्जामुळेच मजुरीची वेळ

तिचे आई-वडील गावीच शेतमजुरी करतात. गौकर्णाच्या मोठ्या बहिणी ऊर्मिला व मीरा यांच्या लग्नासाठी तिच्या घरच्यांनी दीड लाखाचे सावकारी कर्ज घेतले आहे. ते फेडण्यासाठी आणि गौकर्णाच्या लग्नासाठीही पैशाची जोडणी व्हावी म्हणून दहावीतच शाळा सोडलेले मी व कैलास दोघेही यंदा पहिल्यांदाच ऊसतोडणीसाठी आल्याचे विष्णू चिबडे याने सांगितले. त्यांना जेवण बनवून देण्यासाठी तिही त्यांच्यासोबत आली होती. जादा मजुरी मिळावी म्हणून दररोज स्वयंपाक आवरून तिही भावंडांना मदत करीत होती; परंतु काळाने तिच्या आणि भावंडांच्या स्वप्नांचा चुराडा केला.

----------------------------

कोरोनामुळे आले ऊसतोडणीला 'गौकर्णा'ची नववी झाली होती. तिचा भाऊ विष्णू हा पुणेनजीकच्या निगडी येथे बाग कामावर, तर कैलास हा एका मंगल कार्यालयात मजुरीला होता; परंतु कोरोनामुळे मजुरी गेल्याने ते नातेवाइकांसोबत ऊसतोडणीला आले होते. काम संपवून दोन दिवसांतच ते पुन्हा गावी परत जाणार होते; परंतु कर्जफेडीचे स्वप्न उराशी बाळगून दूरदेशी आलेल्या भावंडांना बहिणीचे पार्थिव घेऊन गावी जाण्याची वेळ आली.

Web Title: A young woman from Parbhani drowned in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.