तरुणपणीच वृद्धापकाळाचे आर्थिक नियोजन करावे

By Admin | Updated: December 31, 2014 23:55 IST2014-12-31T23:38:51+5:302014-12-31T23:55:59+5:30

मानसिंग जगताप : ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा, विविध विषयांवर चर्चासत्र

Young people should make financial planning for old age | तरुणपणीच वृद्धापकाळाचे आर्थिक नियोजन करावे

तरुणपणीच वृद्धापकाळाचे आर्थिक नियोजन करावे

कोल्हापूर : घरी पाहुणे येणार म्हटल्यावर आपण जुने पेपर अडगळीत ठेवतो, त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची स्थिती झाली आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिकच स्वत: दोषी आहेत. आपण तरुणपणातच वृद्धापकाळाचे आर्थिक नियोजन केले पाहिजे, असा सूर आज, बुधवारी ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यशाळेतून उमटला. सायबर येथे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन ‘सायबर’चे सल्लागार चेअरमन डॉ. व्ही. एम. हिलगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. मानसिंग जगताप उपस्थित होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘ज्येष्ठ नागरिक धोरण’ या विषयावर बोलताना डॉ. व्ही. एम. हिलगे म्हणाले, सध्या महाराष्ट्र शासनाने १४ जून २००४ पासून ज्येष्ठ नागरिकांविषयीचे धोरण जाहीर केल्यानुसार ६५ वर्षांवरील व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक समजले जाते; तर केंद्र शासनामार्फत ६० वर्षांवरील व्यक्ती ज्येष्ठ समजल्या जातात. त्यामुळे आपल्याच देशात ही मोठी तफावत आहे. ‘इच्छामरण’ या विषयावर बोलताना नीळकंठ कोडोलीकर म्हणाले, इच्छामरणबाबत अजूनही आपल्याकडे वाद चालू आहे. शासनाने याबाबत ज्येष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा करून हा कायद्याबाबत विचार करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दुपारच्या सत्रात ‘ज्येष्ठ नागरिक - एन. एस. एस. समन्वय-सहयोग’ या विषयावर प्राचार्य व्ही. डी. माने म्हणाले, एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांमार्फत ग्रामसफाई, सांस्कृतिक कार्यक्रम , उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्या सोडविण्यासाठी तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे.
‘वैद्यकशास्त्राचा इतिहास’ या विषयावर बोलताना डॉ. मंदार बेडेकर म्हणाले, मानवाचे आरोग्य निसर्ग आणि आहार या गोष्टींवर अवंलबून असते. यामुळे या गोष्टी जपणे गरजेचे आहे. यासाठी सकस आहार व आहाराचे नियोजन करावे.
‘ज्येष्ठ नागरिक सेवा संघ : संघटन व व्यवस्थापन’ या विषयावर अशोकराव केसरकर म्हणाले, दोन भिन्न स्वभावांच्या व्यक्ती एकत्र आल्यानंतरच संसार चांगला होतो. जर एकसारख्या स्वभावाचे लोक एकत्र आले तर त्यांच्यामध्ये भांडणे होतात आणि जर दोन मूर्ख स्वभावाच्या व्यक्ती एकत्र आल्या तर त्यांच्या संसाराची वाट लागते. त्याचप्रमाणे सर्वसमावेशक व्यक्ती एकत्र आल्यानंतरच संघ किंवा संघटना व्यवस्थितरीत्या चालते.
समारोपप्रसंगी डॉ. मानसिंग जगताप म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम ज्येष्ठ नागरिक एकत्र आले पाहिजेत. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सुटण्यासाठी विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रम सुरू करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कार्यशाळेत २०० ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. दीपक भोसले, श्रीनिवास कुरणे, पी. टी. पाटील, विलास पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी )

Web Title: Young people should make financial planning for old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.