पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकाची सहा तासांनंतर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:08+5:302021-06-20T04:18:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : सिदनाळ (ता. निपाणी) येथील वेदगंगा नदीवरील पुलावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकाची सहा तासांनंतर ...

पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकाची सहा तासांनंतर सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : सिदनाळ (ता. निपाणी) येथील वेदगंगा नदीवरील पुलावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकाची सहा तासांनंतर सुटका करण्यात यश आले. दिग्विजय कुलकर्णी (वय ३०) असे युवकाचे नाव असून, तो भैरापूर मत्तीवडे (ता. हुक्केरी) येथील रहिवासी आहे. सिदनाळ येथील नीलेश कांबळे, बाबूराव मिरजे, सुकुमार कोगनोळे, बाबूराब परीट, शंकर कोळी यांनी अथक प्रयत्न करून पाण्यातून बाहेर काढले. अग्निशामक दल व एनडीआरएफच्या जवानांना दिग्विजयला बाहेर काढण्यासाठी अडचण आली; पण स्थानिकांनी त्याला बाहेर काढले.
गेल्या चार दिवसांपासून वेदगंगा क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. वेदगंगा व दूधगंगा या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. येथील बंधारा पाण्याखाली गेला. शनिवारी सकाळी या बंधाऱ्यावर एक जण वाहून आल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदार प्रकाश गायकवाड व ग्रामीण पोलीस स्थानकाचे फौजदार बी. एस. तळवार यांना दिली. तहसीलदार गायकवाड व फौजदार तळवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पुराच्या पाण्यात लाकडी ओंडक्यावर बसलेल्या युवकाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी अग्निशामक दल व चिकोडी येथील एनडीआरएफ पथकाला पाचारण केले.
सुरुवातीला अकोळकडील बाजूने दिग्विजयला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण एनडीआरएफच्या जवानांना यश आले नाही. सिदनाळ येथील नीलेश कांबळे, बाबूराव मिरजे, सुकुमार कोगनोळे, बाबूराब परीट, शंकर कोळी यांनी दिग्विजय याला रस्सीच्या साह्याने पाण्याबाहेर काढले. या वेळी प्रांत अधिकारी युकेश कुमार, सीपीआय संगमेश शिवयोगी व अन्य सहकारी, नोडल अधिकारी, तलाठी घटनास्थळी दाखल झाले होते.