उत्तूरनजीक अपघातात कुडाळच्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST2021-01-16T04:27:05+5:302021-01-16T04:27:05+5:30
अधिक माहिती अशी, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील काही तरुण क्रेटा गाडीतून (एमएच ०७ एजे ५१६६) मधून लोणावळ्यानजीकच्या एकवीरा देवीच्या ...

उत्तूरनजीक अपघातात कुडाळच्या युवकाचा मृत्यू
अधिक माहिती अशी, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील काही तरुण क्रेटा गाडीतून (एमएच ०७ एजे ५१६६) मधून लोणावळ्यानजीकच्या एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शनानंतर महाबळेश्वर परिसरात फिरून ते गावी निघाले होते. तवंदी घाटातून उत्तूरमार्गे आजऱ्याकडे जात असताना मुमेवाडी-उत्तूर दरम्यानच्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्यालगतच्या सिमेंट पोलला जोरात धडकून उलटली. यावेळी रोहित हा गाडीच्या सनराईजमधून बाहेर फेकला गेला. फुटलेल्या सनराईजच्या काचा त्याच्या चेहरा व डोक्यात घुसल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात चालक ओंकार मेघनाथ वालावलकर (२४, रा. लक्ष्मीवाडी-कुडाळ), रोहन कुंभार (३०, कुंभारवाडी-कुडाळ), सायल परब (३०, रा. नाबरवाडी-कुडाळ) हे तिघे किरकोळ जखमी; तर जगन्नाथ पेडणेकर (२९, कुडाळेश्वरवाडी) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अपघातात गाडीचे सात लाखांचे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच आजरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी गडहिंग्लजला हलविले. दरम्यान, कुडाळहून सुशील चिंदरकर, राजू गवंडे, राम राऊळ, शेखर कुंभार यांच्यासह कुडाळकरही घटनास्थळी धाव घेतली.
आजरा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून रोहितचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. बाबूराव सुभाष परब (२९, रा. नावरवाडी, ता. कुडाळ) यांच्या वर्दीवरून आजरा पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एस. कोचरगी करीत आहेत.
------------------------
* रोहित एकुलता
रोहित हा आई-वडिलांना एकुलता होता. अपंगत्वामुळे त्याचे वडील घरीच असतात. त्यामुळे बारावीनंतर तो मिळेल ते काम करून घर चालविण्यासाठी आईला हातभार लावत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे आई-वडिलांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
------------------------
* कुंभारवाडी हळहळली..!
आई-वडिलांना धक्का बसू नये म्हणून रोहितच्या निधनाची बातमी सायंकाळपर्यंत कुंभारवाडीत कळू दिली नव्हती. रोहितचा मृतदेह घरी येताच आई-वडिलांसह नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. होतकरू रोहितच्या आकस्मिक जाण्याने कुंभारवाडी हळहळली.
...............................
उत्तूर (ता. आजरा) येथे मुमेवाडी-उत्तूर मार्गावर ताबा सुटून उलटलेली कार.
क्रमांक : १४०१२०२१-गड-०२
रोहित कुडाळकर : १४०१२०२१-गड-०३