सिरसे येथील तरुणाचा तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:38 IST2021-05-05T04:38:55+5:302021-05-05T04:38:55+5:30

आमजाई व्हरवडे : सिरसे (ता. राधानगरी) येथील रणजीत हरीश टिपुगडे (वय २९)........ हा युवक तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन ...

A young man from Sirse died after touching a broken power line | सिरसे येथील तरुणाचा तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू

सिरसे येथील तरुणाचा तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू

आमजाई व्हरवडे : सिरसे (ता. राधानगरी) येथील रणजीत हरीश टिपुगडे (वय २९)........ हा युवक तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन जागीच ठार झाला. दरम्यान, प्रसंगावधानाने बारा वर्षाच्या.............. मुलीचा प्राण वाचला. महावितरणच्या गलथान कारभाराने एका युवकाचा जीव गेलाच; पण त्याचे कुटुंबही उद्ध्वस्त झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रणजीत टिपुगडे हा युवक आपल्या बारा वर्षाच्या मुलीला............ घेऊन सिरसे आमजाई व्हरवडे रोडवर अमर पाटील यांच्या बंगल्याशेजारी असणाऱ्या शेतात वैरण आणण्यासाठी गेला होता. काल रात्री मुसळधार पाऊस व वादळाने विद्युत वितरणची मुख्य वाहिनी असणारी विद्युत तार तुटून पडली होती; मात्र तुटलेली तार रणजीतला दिसलीच नाही. त्याचा त्या तारेवर पाय पडताच तो अचानक कोसळला, बरोबर असणारी मुलगी आपले वडील........... कसे काय कोसळले म्हणून आरडाओरडा करत असताना ती वडिलांना मिठी मारण्यास जात असतानाच तिथे असणाऱ्या काही ग्रामस्थांनी काही सेकंदातच मुलगीला बाजूला ओढले आणी विद्युत वितरणच्या ऑफिसला फोन करून विद्युत प्रवाह बंद करण्याच्या सूचना केल्या. विद्युत प्रवाह बंद झाला आणि रणजीतला बाजूला केले. तोपर्यंत रणजीतचा जाग्यावरच मृत्यू झाला होता.

तरीही त्याला उपचारासाठी भोगावती येथे खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. डाॅक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. ही बातमी वाऱ्यासारखी सिरसे गावात पसरली. सर्व गाव जमले आणि आवळी बुद्रुक येथील विद्युत वितरण कार्यालयात जमून, आधिकाऱ्यांना धारेवर धरले. तुमच्या बेफिकिरीनेच रणजीतचा बळी गेला. मृतदेह तुमच्या ऑफिसमध्ये आणून ठेवण्याचा इशारा दिला. तुमच्या वरिष्ठांना बोलावून घ्या, असा पवित्रा घेत ग्रामस्थ आक्रमक झाले होते. सरंपच सुभाष पाटील, माजी सरपंच अशोक पाटील यांनी ग्रामस्थांची समजूत काढत ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत महावितरणकडून चार लाख व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून एक लाख अशी पाच लाख रुपयांची मदत टिपुगडे यांच्या कुटुंबाला देण्याची घोषणा करून ग्रामस्थांना शांत केले.

त्यानंतर सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला. संध्याकाळी सिरसे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, रणजीतच्या पश्चात पत्नी, तीन मुली व दोन महिन्यांचा मुलगा आहे.

चौकट १

महावितरण आणखी किती बळी घेणार?

काल संध्याकाळी पाऊस व वादळी वारा असल्याने विद्युत वाहिनीची मुख्य तार तुटून पडली होती; मात्र एवढे मोठे वादळ झाले असताना व तार तुटली असताना साधी चौकशी न करता विद्युत प्रवाह कसा काय चालू केला. एवढी बैफिकिरी का? महावितरण अशा बेफिकिरीने आणखी किती बळी घेऊन किती कुटुंबे उद्ध्वस्त करणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

रणजीतचे कुटुंबच उद्ध्वस्त!

रणजीत लहान असतानाच आईवडिलांचे छत्र हरपले होते. आजीने सांभाळ करत रणजीतला मोठे केले. रणजीतला तीन मुली व दोन महिन्यांचा मुलगा, पॅरेलिसिस झालेली आजी, या सर्वांचा सांभाळ रणजीतच करत होता; मात्र महावितरणच्या बेफिकिरीने रणजीतचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून बारा वर्षाच्या मुलीचे प्राण वाचले; पण त्या कुटुंबाचा सांभाळ कोण करणार, हा प्रश्न आता पुढे आला आहे.

Web Title: A young man from Sirse died after touching a broken power line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.