युवकाला सात वर्षांची सक्तमजुरी
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T23:21:54+5:302015-07-25T01:13:32+5:30
कसब्यातील बलात्कार प्रकरण

युवकाला सात वर्षांची सक्तमजुरी
रत्नागिरी : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या युवकाला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे गतवर्षी हा प्रकार घडला होता. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. बी. डेबडवार यांनी शुक्रवारी हे आदेश दिले. अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोस्को) या कायद्यानुसार पाच हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.आरोपी फहाद मुस्ताक पाठणकर (वय २३, नायरी संगमेश्वर) याने ५ आॅगस्ट २०१४ रोजी एस.टी. बसने कसबा येथे शाळेत जात असताना अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. तिला दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरविले. त्यानंतर ७ आॅगस्ट २०१४ रोजी रात्री रत्नागिरी येथील एस. टी. स्टँडनजीकच्या परिसरातील एका फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम ३६३, ३६६ (अ) आणि ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एम. आर. चिखले यांनी केला. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. बी. डेबडवार यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता विनय गांधी यांनी दहा साक्षीदार तपासले.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश यांनी शुक्रवारी आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दंड न भरल्यास आणखी तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (वार्ताहर)