पट्टणकोडोलीत विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:01+5:302021-05-05T04:39:01+5:30
दरम्यान, संतोष लोंढे याने विहिरीत उडी घेतल्यानंतर काही तरुणांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले होते. यावेळी त्याला समजावूनही सांगण्यात आले ...

पट्टणकोडोलीत विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
दरम्यान, संतोष लोंढे याने विहिरीत उडी घेतल्यानंतर काही तरुणांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले होते. यावेळी त्याला समजावूनही सांगण्यात आले होते. मात्र, काही वेळानंतर पुन्हा संतोषने आई-वडिलांसमोरच विहिरीत उडी मारली; पण यावेळी त्याला कोणीही वाचविण्यास उपस्थित नसल्याने त्याचा अंत झाला. या घटनेने गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की, संतोष लोंढे हा पेठवडगाव येथील रहिवासी असून, गेल्या चार वर्षांपासून तो पट्टणकोडोली येथे आपल्या आजोळी आई-वडिलांसह राहत होता. सोमवारी त्याचा घरामध्ये किरकोळ वाद झाला होता. यावेळी तो आपल्या आईला मरणार अशी धमकी देऊन घरातून निघून गेला. घराजवळच असणाऱ्या विहिरीमध्ये संतोष याने उडी घेतली. यावेळी तेथेच असणाऱ्या काही तरुणांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याला समजावून निघून गेले. मात्र, त्याने त्यानंतरही पुन्हा आई-वडिलांसमोरच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली व आपले जीवन संपविले. या घटनेची माहिती हुपरी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन संतोषचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी नामदेव गेजगे व्हाईट आर्मी इचलकरंजी, बाजीराव कुरुंदवाडे रेस्क्यू फोर्स रांगोळी यांना पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने प्रयत्न करून तब्बल सात तासांनंतर त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. या घटनेची नोंद हुपरी पोलिसात झाली असून, अधिक तपास पीएसआय विजय मस्कर, सहायक फौजदार रावसाहेब हजारे करीत आहेत.
फोटो : संतोष आनंदा लोंढे