कावळेशेतच्या दरीत युवक कोसळला

By Admin | Updated: August 25, 2014 00:02 IST2014-08-25T00:01:01+5:302014-08-25T00:02:34+5:30

आंबोलीजवळील घटना : शोध सुरूच; सातारा जिल्ह्यातील युवक

The young man collapsed in the valley of Kavleshwa | कावळेशेतच्या दरीत युवक कोसळला

कावळेशेतच्या दरीत युवक कोसळला

आंबोली : आंबोली येथे पर्यटनासाठी आलेला रोहित किशोर भिसे (वय २५, रा. सातारा, पारगाव खंडाळा) हा युवक पाण्यातील पाईप व कठड्याचा अंदाज न आल्याने पाईपमधून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. गेळे-कावळेशेत येथील सुमारे सोळाशे फूट खोल दरीत तो कोसळला. ही घटना आज, रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. या ठिकाणी घडलेली महिन्याभरातील ही दुसरी घटना असून, त्या युवकाचा सायंकाळपर्यंत शोध सुरू होता.
कोल्हापूर येथील नऊ युवक सुमो गाडीने आंबोली येथे वर्षापर्यटनासाठी आले होते.
(पान ५ वर)

आपत्कालीन विभागाचा वेळकाढूपणा
आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दिरंगाईचा व वेळकाढूपणाचा प्रत्यय पुन्हा आंबोलीत पहायला मिळाला आहे. घटना दुपारी १.३० वाजता घडूनही घटनास्थळी या व्यवस्थापनाच्या टीमला पोहोचण्यास सायंकाळचे सहा वाजले होते. त्यामुळे ही मोहीम दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आली. या मोहिमेतील सहभागी टीमचा यात कोणताही दोष नाही; परंतु वरिष्ठ स्तरावर निर्णय घेण्यास वेळ लागत असल्याने पुढील सर्वच घडामोडींना उशीर होत होता.

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हे युवक कावळेशेत येथे गेले होते. येथे असलेल्या पाईपच्या दोन फुटांवरून पाणी वाहत होते. त्यावेळी रोहित हा आपले चप्पल पाण्यात टाकून खेळत होता. अचानक तोल जाऊन तो पाईपच्या समोरील छोट्या डोहात पडला. याही परिस्थितीत त्याचा एक मित्र लवू जांभळे याने डोहात उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु तोही पाण्याच्या प्रवाहामुळे पाईपमधून नदीच्या दिशेने ओढला जाऊ लागला. प्रसंगावधान राखून इतर मित्रांनी त्याला वाचवले; परंतु रोहितला वाचविण्यात ते अपयशी ठरले. यात लवू जांभळे याच्या पायाला दुखापत झाली.
याबाबतची माहिती गेळे पोलीस पाटील मोहन कदम यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्रात दिली. लागलीच पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एन. भिसे, ए. बी. नर आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली; परंतु रोहित कोठेही आढळून आला नाही. त्वरित आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधून रामेश्वर सावंत, कमलेश चव्हाण तसेच बाबल आल्मेडा यांच्या टीमला पाचारण केले. सायंकाळी उशिरापर्यंत या टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत होती. यावेळी घटनास्थळी तहसीलदार सतीष कदम व पोलीस निरीक्षक रणजित देसाई उपस्थित होते. (प्रतिनिधी)

आजपासून शोधमोहीम हाती घेणार
कावळेशेत दरीत कोसळेल्या युवकाला शोधण्यासाठी बाबल आल्मेडा यांचे पथक शिरशिगे येथून उद्या सकाळी शोधमोहीम राबवणार असून, आंबोलीतून रामेश्वर सावंत हे दरीत उतरणार असल्याची माहिती आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
रोहित हा कोल्हापूर येथील डी-मार्टमध्ये काम करीत होता. या प्रकारानंतर लगेच त्याच्या वडिलांना व नातेवाइकांना कळविण्यात आले. गेल्या महिन्यात याच ठिकाणी कर्नाटकातील पवन कुलकर्णी हा युवक वाहून गेला होता, त्याच ठिकाणावर आणि अगदी तशाच प्रकारे रोहित भिसे हा वाहून गेला.
पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांनी या पाईपला जाळी बसविण्याची सूचना केली होती. तसे पत्रही बांधकाम विभागाला देण्यात आले होते, पण याबाबतची दखल घेतली नाही. त्यामुळेच आज आणखी एका युवकाचा प्राण गेला. याला जबाबदार कोण, असा सवाल गेळे ग्रामस्थ तसेच सरपंच प्रज्ञा परब यांनी केला आहे. बांधकाम अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: The young man collapsed in the valley of Kavleshwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.