आवळीनजीक कारच्या धडकेत चिकुर्डेचा तरुण जागीच ठार
By Admin | Updated: May 15, 2014 01:05 IST2014-05-15T00:57:39+5:302014-05-15T01:05:11+5:30
देवाळे : कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर आवळी (ता. पन्हाळा) येथील खिंडीजवळ मारुती गाडीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार संतोष शामराव पाटील

आवळीनजीक कारच्या धडकेत चिकुर्डेचा तरुण जागीच ठार
देवाळे : कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर आवळी (ता. पन्हाळा) येथील खिंडीजवळ मारुती गाडीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार संतोष शामराव पाटील (वय ३३, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) हे जागीच ठार झाले. हा अपघात आज, बुधवारी सकाळी झाला. घटनास्थळ व कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संतोष पाटील हे चरण (ता. शाहूवाडी) येथे आपल्या मामाच्या लग्नानिमित्त गोंधळाचे जेवण जेवून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून ड्यूटीवर जाण्यासाठी निघाले. याचवेळी आवळी खिंडीजवळ आले असता समोरून येणार्या चारचाकी गाडीचे उजव्या बाजूचे दोन्ही टायर (पुढील व मागील) फुटून भरधाव वेगात असणार्या या गाडीची (एमएच ५० ए ४१३४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. चारचाकी गाडी दाऊद याकूब आंबेकरी (मु.पो. खोडशी, ता. कºहाड) यांच्या मालकीची असून, ते स्वत: गाडी चालवत होते. दुचाकीला धडक दिल्यानंतर गाडी रस्त्यावर उलटली व डाव्या बाजूला थांबली. यामध्ये दाऊद आंबेकरी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. आंबेकरी हे इचलकरंजी येथून कुटुंबीयांसह विशाळगडकडे चालले होते. या अपघाताची माहिती सरपंच तानाजी मदने यांनी कोडोली पोलिसांना दिली. उपसरपंच अनिल पाटील यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला. ड्यूटी संपवून शाहूवाडीकडे जाणारे कोडोली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संग्राम शिंदे व श्रीकांत शिंदे यांनी घटनेचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.