पेन्शन पुन्हा मिळवून देणारच
By Admin | Updated: August 29, 2015 00:35 IST2015-08-29T00:35:53+5:302015-08-29T00:35:53+5:30
संजय मंडलिक : मुरगूडमध्ये पेन्शनधारकांचा भव्य मोर्चा

पेन्शन पुन्हा मिळवून देणारच
मुरगूड : मुरगूडमध्ये शुक्रवारी शिवसेना व मंडलिक युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शनधारकांसाठी काढण्यात आलेला मोर्चा हा केवळ इशारा मोर्चा आहे. कोणी म्हणते म्हणून पेन्शन बंद केली असेल तर त्या सर्व पेन्शनधारकांना पेन्शन मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.यावेळी गाव चावडीवर काढण्यात आलेला मोर्चा नाका क्र. १ पासून सुरूझाला. बाजारपेठेतून तुकाराम चौकामार्गे अंबाबाई मंदिर अशा मार्गाने महिलांसह मोठ्या संख्येने पेन्शनधारक सहभागी झाले होते. आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी यांना देण्यात आले.
मंडलिक म्हणाले, समाजातील दिन-दुबळ्या व ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळावा म्हणून शासनाने संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजना लागू केल्या आहेत; पण मात्र वंचिताना प्रत्यक्ष लाभ होतच नाही अशा वंचित लोकांचा या योजनेत समावेश करावा. कोणीतरी सांगतेय म्हणून या योजनेतील लाभार्थ्यांना चौकशीच्या नोटिसा लागू केल्या आहेत. या नोटिसा ताबडतोब रद्द करून चौकशी थांबवावी. काही पेन्शन धारकांच्या अंगठ्यावरचा ठसा मशीन स्वीकारत नाही. अशांची पेन्शन बंद होऊन रोजी -रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशांची पेन्शन पूर्वरत सुरू करावी, रेशन धान्य लाभार्थ्यावरीलही जाचक अटी शिथिल करून वंचिताना न्याय द्यावा. उत्पादनाचे दाखले तलाठ्याकडे मिळावेत. यासाठी आजचा मोर्चा हा फक्त इशारा देण्यासाठी आहे. पालकमंत्री यांना भेटून पेन्शनधारकांची गाऱ्हाणे मांडणार असून, वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी सभापती भूषण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बिद्री कारखान्याचे संचालक राजेखान जमादार यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, नामदेव मेंडके, पांडुरंग भाट, किरण गवाणकर, सुहास खराडे, सर्जेराव पाटील, आर. डी. पाटील, आनंदा फराकटे यांच्यासह परिसरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीरेंद्र मंडलिक यांनी आभार मानले.