सत्यशोधक विवाहातून योगेश फोंडेंची सामाजिक बांधीलकी
By Admin | Updated: June 4, 2015 00:57 IST2015-06-04T00:56:58+5:302015-06-04T00:57:28+5:30
विधायक उपक्रम : खर्चाला फाटा देत नेपाळ भूकंपग्रस्तांना १५ हजारांची मदत

सत्यशोधक विवाहातून योगेश फोंडेंची सामाजिक बांधीलकी
कोल्हापूर : पुरोहितशाही, कर्मकांड अशा पारंपरिक पद्धतीच्या विवाहाला फाटा देत सह्याद्री लोकविकास संस्थेचे सचिव डॉ. योगेश फोंडे व रुपाली बाडगंडी (सोलापूर) यांनी सत्यशोधक पद्धतीने बुधवारी विवाह केला. इतर विवाहांप्रमाणे कसलाही डामडौल न करता अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्या नववधू-वरांवर टाकण्यात आल्या. विवाहात होणारा खर्च टाळून १५ हजार रुपयांची मदत या नवदाम्पत्याने नेपाळ भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिली.
शाहू स्मारक भवन येथे हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पुतणे सुभाष पाटील, ‘माकप’चे नेते चंद्रकांत यादव, भाकपचे नेते कॉ. नामदेव गावडे, के. डी. खुर्द उपस्थित होते. मुलीचे मामा दत्ता हुंडेकर, आई सुमित्रा बाडगंडी, मुलाचे वडील आनंदराव फोंडे, आई संध्या फोंडे, भाऊ गिरीष फोंडे हेही यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात कॅप्टन उत्तम पाटील यांच्यासाठी सानेगुरुजी यांनी तयार केलेली प्रतिज्ञा ‘अंनिस’चे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी वधू-वरांना शपथ दिली. सांगलीचे सदानंद कदमलिखित समतेवर आधारित आधुनिक मंगलाष्टका इंद्रायणी पाटील व संजय रेंदाळकर यांनी म्हटली.
भाकपचे शहर सचिव अनिल चव्हाण यांनी सत्यशोधक विवाहाची भूमिका स्पष्ट केली. कृष्णात कोरे यांनी सूत्रसंचालन केले. सतीशचंद्र कांबळे यांनी आभार मानले. हरिष कांबळे यांनी वधू-वरांसह पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी रघुनाथ कांबळे, शिवाजी शिंपी, यांच्यासह डाव्या चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नेपाळमधील काही गावे पुनर्वसनासाठी दत्तक घेणार
पुरोहितशाही, कर्मकांड व विषमतेवर आधारित परंपरेला फाटा देत फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी हा विवाह पार पडला. विवाहातील २५ टक्के रक्कम म्हणजे १५ हजार रुपये नेपाळमधील भूकंपग्रस्तांना देण्यात आला. वर्ल्ड फेडरेशन आॅफ डेमॉक्रटिक युथचे उपाध्यक्ष गिरीष फोंडे यांच्या नेतृत्वाखालील जगभरातील युवक नेत्यांचे शिष्टमंडळ मंगळवार (दि. ९) ते गुरुवार (दि.११) नेपाळला भेट देऊन तेथील काही गावे पुनर्वसनासाठी दत्तक घेणार आहे. त्यावेळी ही रक्कम सरकारला देण्यात येणार आहे.