होय, शासनाचा निर्णय बरोबरच!
By Admin | Updated: April 10, 2015 00:35 IST2015-04-09T23:42:25+5:302015-04-10T00:35:03+5:30
प्रतिक्रिया : मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटाचे आदेश

होय, शासनाचा निर्णय बरोबरच!
सांगली : राज्यातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखविणे बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. सांगली शहरातील काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया.
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असल्याने येथील चित्रपटगृहात मराठी चित्रपटांना मानाचे स्थान मिळणे गरजेचे आहे. सध्या हिंदी चित्रपटाच्या तोडीस तोड मराठी चित्रपट निर्माण होत आहेत. परंतु मल्टिप्लेक्समध्ये ते सकाळी प्रदर्शित होतात. परिणामी त्यांना प्रेक्षकांचा योग्य प्रतिसाद मिळत नाही. शासनाने घेतलेल्या निर्णयाचा लाभ निश्चितपणे मराठी दिग्दर्शक व निर्मात्यांना होईल.
- अजिंक्य पाटील, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना सांगली.
५
सध्या मराठी चित्रपट पाहिले तर ते कोणत्याच क्षेत्रात कमी असल्याचे जाणवत नाही. अनेक चांगले विषय नेमकेपणाने युवा दिग्दर्शक हाताळत आहेत. प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखविले पाहिजेत, ही मराठीप्रेमींची जुनीच मागणी होती. त्याला आता शासनाने मूर्त रूप दिले आहे. परंतु आता खरी जबाबदारी ही प्रेक्षकांची आहे. त्यांनी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहायला हवेत.
- नितीन शिंदे, माजी आमदार, मनसे नेते, सांगली.
मराठी चित्रपटाची क्षितिजे विस्तारत चालली आहेत. आज एकापेक्षा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सध्या मध्यमवर्गीयांनाही मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्याची हौस असते. परंतु प्राईम टाईमला मराठी चित्रपट नसल्याने आतापर्यंत प्रेक्षकांची निराशा होत होती. ती शासन निर्णयामुळे दूर झाली आहे.
- गणेश शिवकाळे, बॅँक कर्मचारी, प्रेक्षक सांगली.
शासनाचा हा निर्णय मराठी चित्रपटांच्या हिताचा आहे. परंतु प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखविल्यास त्याला मराठी प्रेक्षक कमी प्रमाणात येतात, ही वस्तुस्थिती आहे. मराठी चित्रपट कोणत्या वेळेत दाखवावेत, याबाबत मुंबईत बैठक होत असल्याने त्याविषयी आताच अधिक भाष्य करता येणार नाही.
- सतीश चाफळकर, चित्रपटगृह चालक, सांगली.
मराठी चित्रपट निर्माते आजकाल चित्रपट निर्मितीसाठी खर्चास मागेपुढे पाहात नाहीत. साहजिकच दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आतापर्यंत मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखविले जात नव्हते. शासकीय निर्णयामुळे भविष्यकाळात ते दाखविले जातील. यामुळे मराठी दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांना प्रोत्साहन मिळेल.
- हरी कुलकर्णी, व्यवस्थापक, स्वरूप चित्रमंदिर, सांगली.