यंदाही लाभांशाविनाच संस्थांचा भ्रमनिराश

By Admin | Updated: July 28, 2014 23:14 IST2014-07-28T22:10:24+5:302014-07-28T23:14:53+5:30

संस्थांचे सव्वाशे कोटी सात वर्षे बिनव्याजी

This year's illusion of institutions without profit margins | यंदाही लाभांशाविनाच संस्थांचा भ्रमनिराश

यंदाही लाभांशाविनाच संस्थांचा भ्रमनिराश

राजाराम लोंढे - कोल्हापूर ,, ,कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सभासदांना यंदाही लांभाश मिळणार नाही. सव्वाशे कोटींचे भांडवल गेली सात वर्षे बिनव्याजी बॅँकेत पडून असल्याने संस्थांचे मोठे नुकसान होत असून, यंदा बॅँकेला ‘अ’ वर्ग मिळाल्याने लाभांश मिळेल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या संस्थांचा भ्रमनिराश झाला आहे. संस्थांना वर्षाला दहा ते बारा कोटींचा फटका बसत असून, बॅँक नफ्यात मग संस्थांना का मारता, असा सवाल संस्थाचालकांमधून विचारला जात आहे.
जिल्ह्यातील दहा हजार ६७८ संस्था जिल्हा बॅँकेच्या सभासद आहेत. तर ७१० व्यक्ती सभासद आहेत. पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज या माध्यमातून सहकारी संस्थांचे लाखो रुपये जिल्हा बॅँकेकडे भागभांडवल स्वरूपात आहेत. यावर बॅँक प्रत्येकवर्षी लाभांश देत होती; पण बॅँकेच्या संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभाराने १३ नोव्हेंबर २००९ ला बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले. बॅँकेला तशी २००६-०७ या आर्थिक वर्षापासूनच घरघर लागली होती. संचालक मंडळांना व्यवहार सावरण्याची संधी तशी तीन वर्षे मिळाली; पण त्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही. परिणामी प्रशासक आले. बॅँक सेक्शन ११(१) मध्ये असल्याने सभासदांना लाभांश देताच येत नाही. त्यामुळे २००७-०८ पासून संस्थांना लाभांश दिलेला नाही. अगोदरच व्याज कपातीमुळे विकास संस्था आतबट्टयात आल्या आहेत. त्यात बॅँकेने गेली सात वर्षे लाभांश दिला नसल्याने संस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बॅँक अडचणीत होती तोपर्यंत ठीक आहे; पण आता बॅँक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे. गेली चार वर्षे बॅँक नफ्यात आहे. यावर्षी बॅँकेला ‘अ’ वर्ग मिळालेला आहे. मग संस्थांना लाभांश देण्यात अडचण काय, अशी विचारणा संस्थाचालकांकडून होत आहे.

शासन व बॅँकेच्या धोरणांमुळे विकास संस्था अडचणीत आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जिवावर मोठी झालेली बॅँक संस्थांनाच पायाखाली घेत आहे. हे चुकीचे असून बॅँक नफ्यात आहे, तर लाभांश का देत नाही. याबाबत सभेत जाब विचारला जाईल.
- हिंदुराव मेटील (संस्थापक, अध्यक्ष हनुमान विकास, गाडेगोंडवाडी)

-बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना दहा टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता देता. त्यावेळी संचित तोटा दिसत नाही का?
-कर्मचाऱ्यांच्या पगारावर वर्षाला ८० कोटी खर्च होतो आणि शेतकऱ्यांना देण्यासाठी बॅँकेकडे दहा कोटी नाहीत.
-बॅँक फक्त शेतकऱ्यांनीच वाचवायची काय? असा सवाल संस्थाचालकांमधून केला जात आहे.
शासन व बॅँकेच्या धोरणांमुळे विकास संस्था अडचणीत आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जिवावर मोठी झालेली बॅँक संस्थांनाच पायाखाली घेत आहे. हे चुकीचे असून बॅँक नफ्यात आहे, तर लाभांश का देत नाही. याबाबत सभेत जाब विचारला जाईल.
- हिंदुराव मेटील (संस्थापक, अध्यक्ष हनुमान विकास, गाडेगोंडवाडी)

Web Title: This year's illusion of institutions without profit margins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.