यंदाची जयंतीही अपूर्ण जन्मस्थळातच...
By Admin | Updated: June 15, 2014 01:48 IST2014-06-15T01:40:22+5:302014-06-15T01:48:19+5:30
राधानगरी धरणाच्या प्रतिकृतीसह बाह्य परिसराचा विकास होणे अद्याप बाकी

यंदाची जयंतीही अपूर्ण जन्मस्थळातच...
राजर्षी शाहू जयंती : धरणाच्या प्रतिकृतीसह बाह्य परिसराची कामे बाकी; म्युझिअमच्या आराखड्यावर निर्णयच नाही
कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून रखडत-रखडत सुरू असलेल्या कामांमुळे यंदाही राजर्षी शाहू महाराजांची जयंती अपूर्ण असलेल्या शाहू जन्मस्थळातच करावी लागणार आहे. जन्मस्थळाच्या इमारती पूर्ण झाल्या असल्या तरी राधानगरी धरणाच्या प्रतिकृतीसह बाह्य परिसराचा विकास होणे अद्याप बाकी आहे. इमारतीत उभारण्यात येणाऱ्या म्युझिअमच्या आराखड्यावर अद्याप निर्णयच झालेला नसल्याचे समजते.
शाहू जन्मस्थळ नूतनीकरणाला आॅगस्ट २०१२ मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीपासून वादांची पार्श्वभूमी आणि संथगतीने चाललेले काम यामुळे यंदाचे तिसरे वर्ष चालू असले तरी जन्मस्थळाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या जन्मस्थळाच्या ए, बी, सी, डी या मुख्य चार व प्रवेशद्वाराजवळच्या इमारती पूर्ण झाल्या आहेत. मुख्य इमारतीच्या पश्चिमेला ग्रंथालयासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीत फरशी घालण्याचे कामही तीन-चार दिवसांत संपणार आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असलेली कामे आता पूर्ण झाली आहेत. बाह्य परिसरात प्रवेशद्वारापासून ते पूर्ण परिसरात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने दगडी रस्ता करण्यात आला आहे. मात्र, राधानगरी धरणाच्या प्रतिकृतीचे बांधकाम अद्यापही पूर्ण होणे बाकी आहे. या धरणाचा दर्शनी भाग तयार असून त्याचे फॅब्रिकेशन, स्वयंचलित दरवाजे बनवणे अशा वाढीव कामांसाठी पुरातत्व खात्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे
१ कोटी ३६ लाखांचा निधी वर्ग केला आहे. जन्मस्थळाच्या नूतनीकरणासाठी लागणारा निधी पुरविण्यात शासनाने हात आखडता घेतलेला नाही. मागणी करताच निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, संथगतीने चाललेले काम, वाद आणि अन्य तांत्रिक मुद्दे यांमुळे किमान आणखी एक-दीड वर्ष तरी जन्मस्थळाचे काम सुरूच राहणार आहे. परिणामी, यंदाही महाराजांची जयंती अपूर्णावस्थेत असलेले जन्मस्थळ आणि रिकाम्या इमारतीत साजरी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)