यावर्षीही विद्यार्थ्यांना मारावे लागणार हेलपाटे
By Admin | Updated: June 1, 2015 00:19 IST2015-05-31T22:53:42+5:302015-06-01T00:19:43+5:30
सातारा, सांगलीचा समावेश : अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया नाही

यावर्षीही विद्यार्थ्यांना मारावे लागणार हेलपाटे
संतोष मिठारी - कोल्हापूर -नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नसल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे इचलकरंजी, सांगली, कराड आणि सातारा या ठिकाणी अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू केली जाणार नाही. त्यामुळे येथील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना यावर्षी विविध महाविद्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागणार आहेत.
कोल्हापूर शहरात २००८ पर्यंत अकरावी प्रवेश प्रक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणारी होती. त्यात गोंधळाची परिस्थिती होती. ही प्रक्रिया सोयीस्कर करण्यासह गोंधळ बंद व्हावा, या उद्देशाने २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून तत्कालीन शिक्षण उपसंचालक सर्जेराव जाधव यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि पालकांचा होणारा त्रास, धावपळ थांबली. त्यामुळे प्रक्रियेला कोल्हापूर शहरातील विद्यार्थी, पालकांनी स्वीकारले. अकरावीच्या प्रवेशात या प्रक्रियेमुळे सुसूत्रता आली. कोल्हापूर विभागातील इचलकरंजी, सांगली, कराड आणि सातारामधील महाविद्यालयांत अकरावी प्रवेशात सुसूत्रता आणण्यासाठी गेल्यावर्षी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे निश्चित केले. त्यानुसार याबाबतची प्राथमिक माहितीदेखील घेण्यात आली.
संबंधित प्रवेश प्रक्रिया यंदापासून याठिकाणी सुरू केली जाणार होती. मात्र, त्याचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने यावर्षी ती सुरू होणार नाही. त्यामुळे इचलकरंजी, सांगली, कराड आणि सातारातील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागणार आहे शिवाय त्यांचा वेळ आणि पैसादेखील वाया जाणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून सुरू करणे अधिक सोयीस्कर ठरणारे होते.
या प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी नियोजनाबाबत पुरेसा वेळ उपलब्ध नाही हे शिक्षण विभागाकडून सांगितले जाणारे कारण अयोग्य आहे. विभागाने दोन महिन्यांपूर्वीचे नियोजन करणे गरजेचे होते. प्रक्रिया यावर्षीपासून सुरू करण्याबाबत प्रयत्न करावेत.
- रोहित पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
पुरेसा वेळ मिळाला नाही
अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी आणि प्रशासनाच्यादृष्टीने सोयीस्कर ठरणार आहे. मात्र, एखाद्या शहरात सुरू करावयाची असल्यास त्यासाठी प्रस्ताव तयार करून तो शिक्षण विभागाला सादर करावा लागतो. त्याला मान्यता मिळाल्यानंतर प्रक्रिया सुरू करता येते शिवाय त्यासाठी पालक, विद्यार्थी व शिक्षकांची तयारी आवश्यक आहे. चार-पाच दिवसांत दहावीचा निकाल जाहीर होईल. ते लक्षात घेता इचलकरंजी, सांगली, कराड व सातारा येथे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक वेळ मिळणार नाही. त्यामुळे पुढील वर्षापासून प्रक्रिया राबविण्याचा विचार केला जाईल, असे कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले.