यंदा सातवी, नववीचाअभ्यासक्रम बदलणार
By Admin | Updated: June 1, 2017 00:24 IST2017-06-01T00:24:16+5:302017-06-01T00:24:16+5:30
आठवीचा संस्कृत अभ्यासक्रमही बदलणार : नव्या रचनेत संभाषणावर भर

यंदा सातवी, नववीचाअभ्यासक्रम बदलणार
भरत शास्त्री । लोकमत न्यूज नेटवर्क
बाहुबली : आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सातवी व नववीचा पूर्ण, तर आठवीचा फक्त संस्कृतचा अभ्यासक्रम बदलणार आहे. आठवीची अन्य पुस्तके पुढीलवर्षी बदलणार आहेत; पण शाळा अथवा स्थानीय प्रशासनाला मात्र याची काहीच कल्पना नाही, पण कृतिपत्रिकेच्या स्वरूपात संस्कृतच्या आठवीच्या पुस्तकाची छपाई सुरू असून लवकरात लवकर शाळांना पुस्तके पुरवली जाणार आहेत.
या पुस्तकाच्या नवीन रचनेत संभाषणावर भर देण्यात आला आहे. नववीला भाषेच्या वापरावर आधारित प्रश्न असलेल्या कृतिपत्रिकेची तयारी आता आठवीपासूनच होणार आहे. आतापर्यंत मराठीतून अर्थ सांगून किंवा मराठीतून सूचना देत संस्कृत शिकवत होते. प्रश्नपत्रिकेतील सूचनाही मराठी किंवा ज्या भाषेतून विद्यार्थी शिक्षण घेतो त्या भाषेत सूचना दिल्या जात होत्या, पण नवीन पुस्तक रचनेनुसार मात्र सूचना शब्दार्थ हे देखील संस्कृतमधूनच देण्यात आले आहेत.
नवीन पुस्तक अगदी सोपे, सुटसुटीत, चित्रमय व आकर्षक बनविण्यात आले आहे. स्व-अध्ययन, कृतियुक्त मूल्यमापन, ज्ञानरचनावाद अशा आधुनिक संकल्पना या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणल्या जात आहेत.
संस्कृत भाषेची ओळख विद्यार्थ्यांना आठवीला पहिल्यांदा होते. यावर्षी जुन्या पुस्तकानुसार अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी नववीला नव्या रचनेनुसार अभ्यास करावा लागणार होता, पण नवीन पुस्तकामुळे ही तफावत राहणार नाही. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
प्रश्नांची तयारी
इयत्ता नववी व पुढे दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये होणारे अपेक्षित बदल नजरेसमोर ठेवून या पुस्तकाची रचना केली आहे. उतारावाचन, ई-मेल लेखन, शब्दकोडे अशा प्रश्नांची तयारी इयत्ता आठवीपासूनच होण्याच्या दृष्टीने पुस्तकामध्ये बदल करण्यात आले आहेत.