यंदा वाळू प्लॉट ठेकेदारांच्या सोयीचे

By Admin | Updated: November 20, 2015 00:05 IST2015-11-19T23:28:12+5:302015-11-20T00:05:52+5:30

६७ प्लॉटचे आॅनलाईन लिलाव सुरु : तीस कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता

This year, sand plant contractors are convenient | यंदा वाळू प्लॉट ठेकेदारांच्या सोयीचे

यंदा वाळू प्लॉट ठेकेदारांच्या सोयीचे

महादेव कांबळे -- सांगली -शासनाच्या पर्यावरण खात्याने जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीतील ६९ पैकी ६७ वाळू प्लॉटना आॅनलाईन लिलावासाठी मंजुरी दिली आहे. आॅनलाईन लिलावाला बुधवारपासून प्रारंभ करण्यात आला. गतवर्षाचा कटू अनुभव लक्षात घेता, यंदा वाळू प्लॉटची लिलाव प्रक्रिया ठेकेदारांसाठी सोयीची करण्यात आली आहे. प्लॉटची लांबी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्लॉटचे लिलाव होऊन यंदा शासनाला यामधून तीस कोटीपर्यंत महसूल मिळण्याची शक्यता आहे.
यावर्षी सांगली जिल्हा प्रशासनाने राज्य पर्यावरण समितीपुढे ६९ वाळू प्लॉटचे प्रस्ताव ठेवले होते. त्यापैकी ६७ प्लॉटना मंजुरी मिळाली. याचे आता आॅनलाईन लिलाव १८ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. ही आॅनलाईन प्रक्रिया ५ डिसेंबररोजी पूर्ण होणार आहे. सध्याच्या आॅनलाईन प्रक्रियेत शासनाने मोठे बदल केले आहेत. या बदलामुळे वाळू लिलाव प्रक्रियेत बदल तर झाले आहेतच, त्याचबरोबर लिलावातील वाळू प्लॉटचा आकारही लहान करण्यात आला आहे. वाळू प्लॉटची लांबी व रुंदी कमी करण्यात आली आहे. गतवर्षी एक वाळू प्लॉट सुमारे तीस हजार ब्रास इतका मोठा होता. त्यामुळे त्याची शासकीय किंमतीही सुमारे दीड कोटीहून अधिक होती. त्यामुळे गतवर्षी ५० पैकी केवळ तीन वाळू प्लॉटचे लिलाव झाले. त्यामुळे केवळ पाच कोटीचाच महसूल प्रशासनाला प्राप्त झाला. दुसऱ्या बाजूला वाळूचे दर गगनाला भिडले. दोन-अडीच हजार रुपये ब्रास असणारा वाळूचा दर पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत गेला होता. त्यामुळे सामान्यांना घर बांधणे अवघड झाले होते. वाळू उपसा झाला नसल्यामुळे वर्षभर वाळूचे दर तेजीत राहिले. यावर्षी दोन हजार ते साडेचार हजार ब्रासचेच वाळू प्लॉट करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांची लांबीही दोन कि.मी.ऐवजी सुमारे तीस ते ५०० मीटरपर्यंत करण्यात आली आहे. प्लॉटची शासकीय किंमतही आता तीस ते ८० लाखादरम्यान आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील वाळू प्लॉटना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.


असा होणार लिलाव
ई-लिलावात भाग घेण्यासाठी नोंदणी करणे : १८ ते २५ नोव्हेंबर
ठेकेदारांना मान्यता देणार : २६ नोव्हेंबर
आॅनलाईन निविदा दाखल करणे : २१ नोव्हेंबर ते १ डिसेंबर
ई-लिलाव सुरु : २ डिसेंबर सकाळी ११ पासून
ई-लिलावाची अंतिम मुदत : ४ डिसेंबर
लिलाव उघडणार : ५ डिसेंबर रोजी

साठा अधिक : वाळूचे दर उतरण्याची शक्यता
गतवर्षी वाळू उपसा न झाल्याने यंदा प्लॉटमध्ये वाळूचा साठा अधिक आहे. त्याचबरोबर वाळू प्लॉट ठेक्यासाठी सोयीचे करण्यात आल्याने उपसाही येत्या पंधरवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी वाळूचे दर उतरण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे दहा डिसेंबरपासून वाळू उपलब्ध होण्याची शक्यता आहे.


मजुरांना काम मिळणार
सांगली जिल्ह्यामध्ये सुमारे तीस ते चाळीस हजार बांधकाम कामगार आहेत. यामधील पंधरा हजार कामगारांची कामगार कार्यालयाकडे नोंदणी आहे. गतवर्षी वाळूअभावी बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला होता. सध्या वाळू नसल्यामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. वाळू उपशास प्रारंभ झाल्यास बांधकाम मजुरांना काम मिळणार आहे.

Web Title: This year, sand plant contractors are convenient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.