‘फळांचा राजा’वर यंदा मंदीचे सावट
By Admin | Updated: April 8, 2015 00:27 IST2015-04-07T23:52:05+5:302015-04-08T00:27:12+5:30
दरामध्ये घसरण : मोठ्या प्रमाणात आवक होऊनही खरेदीस जोर नाही

‘फळांचा राजा’वर यंदा मंदीचे सावट
कोल्हापूर : ‘फळांचा राजा’ म्हणून आंब्याची ओळख आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झाली असून, दरामध्येहीे घसरण झाली आहे. तरीही, आंबा खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरविली असल्याचे बाजारात चित्र आहे. गत आठवड्यात झालेला वळवाचा पाऊस व तसेच एकूणच बाजारातील आर्थिक मंदिचा परिणाम या फळांच्या राजाच्या खरेदीवर जाणवत आहे.
गेल्या महिन्यात कोल्हापूरच्या बाजारात आंब्यांची आवक झाली. सुरुवातीला पेटीचा दर सुमारे तीन हजारांच्या आसपास होता. त्यानंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या दरात झपाट्याने घसरण झाली. १५ दिवसांपूर्वी देवगड हापूस आंबा एक हजार डझन होता. तो आता अडीचशे ते ८०० रुपयांच्या घरात आला आहे. विशेषत: बाजारात देवगड, मालवण हापूस आंबा आला असला, तरी त्याच्यासारखा हुबेहूब कर्नाटक आंबा आहे. त्यामुळे ग्राहक हापूस म्हणून कर्नाटक आंब्याकडे आकर्षित होत आहते.
सध्या लालबाग आंबा शंभर रुपयांपासून ते दीडशे रुपये डझन, तर केसर दीडशे ते दोनशे रुपयांच्या घरात गेला आहे. पायरी दीडशेंपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत गेला आहे.
देवगड, मालवण हापूस अडीचशे रुपये ते पाचशे रुपये डझन झाला आहे. कर्नाटकी आंबा ५०० रुपये डझन आहे. दरम्यान, शहरात आंब्याचे २५ व्यापारी आहेत; पण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तसेच दरामध्ये सुमारे ४०० रुपयांची घसरण होऊनही बाजारात आंबा खरेदीला गर्दी दिसत नाही.
आंब्याची आवक आहे; परंतु, मंदीच्या परिणामामुळे सर्वसामान्य ग्राहकाने याकडे पाठ फिरविली आहे.
- यासीन पन्हाळकर,
आंबा विक्रेते, लक्ष्मीपुरी.