गणेशोत्सवावर यंदा ‘चायना’ मार्केटचे सावट

By Admin | Updated: August 24, 2014 22:37 IST2014-08-24T21:54:19+5:302014-08-24T22:37:49+5:30

स्वरूप बदलले : विद्युत रोषणाईसाठी आजकाल सर्रास चायना वस्तूंचा वापर

This year, Ganeshotsav's 'China' market is in tatters | गणेशोत्सवावर यंदा ‘चायना’ मार्केटचे सावट

गणेशोत्सवावर यंदा ‘चायना’ मार्केटचे सावट

एजाज पटेल- फुणगूस --विदेशी वस्तूंचा भारतीय बाजारपेठेवरील प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. गणेशोत्सवही त्याला अपवाद ठरणार नाही, असे दिसू लागले आहे. गणेशोत्सवात करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईसाठी आता चायना मेड माळांची संगमेश्वर बाजारपेठेत चांगली चलती असून, हळूहळू अशा प्रकारच्या चायना मेडच्या इतर वस्तू येथील बाजारपेठ लवकरच काबीज करणार असे दिसू लागले आहे.
परदेशातून मोठ्या प्रमाणावर माल येत असल्याने भारतीय कारागीर बेरोजगार होत चालल्याचे अनेक क्षेत्रात दिसून येत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावरही विदेशी वस्तूंचा प्रभाव असल्याचे दिसून येत असून रोषणाईसाठी चायनीज माळांना मोठी मागणी आहे. गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळापासून घरगुती स्वरुपात करण्यात येणाऱ्या सजावटीसाठी रोषणाई करण्यात येते. आतापर्यंत यासाठी देशी बनावटीच्या माळा वापरल्या जायच्या. परंतु आता त्यामध्ये फारसे काही नावीन्य राहिले नसल्याने गणेशभक्तांना ‘चायना मेड’ माळांचा मोळ पडू लागला आहे.
या माळांच्या किमती कमी आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये विविधताही असल्याने संगमेश्वर बाजारपेठेत त्याना मागणी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. आज चायनीज माळांनाच बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असून, भारतीय तोरणांची मागणी घटली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येते.
काही वर्षांपूर्वी गणेशोत्सव किंवा इतर उत्सवांमध्ये विद्युत रोषणाई करण्यासाठी महागडी भारतीय तोरणे लावण्याची फार हौस होती. मात्र, या रोषणाईच्या व्यापारावर चायनीज तोरणांनी आक्रमण केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून बाजारपेठेत चायनीज तोरणांची मागणी वाढत आहे. स्वस्त दरात मिळणारी ही तोरणे ३० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध असून, देशी बनावटीच्या माळांच्या तुलनेत त्या खूप स्वस्त आहेत.
प्रकाशमान होणाऱ्या विविध फुलांच्या माळा, वेली, रंग बदलणारे बल्ब, झालरी, गोळे, कंदील पक्षांच्या आकाराचे दिवे, नाजूक नक्षीच्या माळा, पाण्याचे कारंजे, फळासारखे दिसणारे बल्ब हे अगदी कमी किमतीपासून बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या मालाची नो गॅरंटी असली तरीही या चायनीज तोरणांचा एक बल्ब केवळ २ ते ३ रुपयांना मिळतो.
भारतीय विद्युत तोरणामध्ये वेगळेपणा नाही. त्याच त्याच आकारातील आणि तेच तेच रंग घेऊन ग्राहक कंटाळले आहेत. या माळा चायनीजपेक्षा महागड्याही ठरत आहेत. ३०० ते ३५० रुपयांमध्ये पन्नास बल्ब असल्याने तोरणांकडे ग्राहक पाठ फिरवत आहेत.
सध्या चायना मार्केटने प्रत्येक वस्तूचे मार्केट मोठ्या प्रमाणावर व्यापले आहे. त्याचा प्रभाव गणपती उत्सवासाठीच्या वस्तू खरेदीवर पाहायला मिळत आहे. ( वार्ताहर)

Web Title: This year, Ganeshotsav's 'China' market is in tatters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.