यशस्विनीराजे यांनी लंडनमधून मिळविली ‘बी.ए.’ची पदवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:30 IST2021-08-21T04:30:00+5:302021-08-21T04:30:00+5:30
कोल्हापूर : येथील राजकन्या यशस्विनीराजे मालोजीराजे छत्रपती यांनी लंडन येथील रिजेन्टस युनिव्हर्सिटीमधून ग्लोबल मॅनेजमेंट (लीडरशिप अँड मॅनेजमेंट) या विषयातून ...

यशस्विनीराजे यांनी लंडनमधून मिळविली ‘बी.ए.’ची पदवी
कोल्हापूर : येथील राजकन्या यशस्विनीराजे मालोजीराजे छत्रपती यांनी लंडन येथील रिजेन्टस युनिव्हर्सिटीमधून ग्लोबल मॅनेजमेंट (लीडरशिप अँड मॅनेजमेंट) या विषयातून बी.ए.ची पदवी मिळविली. विशेष प्रावीण्य श्रेणीत त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. परदेशी विद्यापीठातून पदवी मिळविणाऱ्या त्या कोल्हापूर संस्थानाच्या पहिल्या राजकन्या ठरल्या आहेत. या युनिव्हर्सिटीकडून त्यांना दि. १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दीक्षान्त समारंभात पदवी प्रदान केली जाणार आहे.
वीस वर्षीय यशस्विनीराजे या माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. कोल्हापुरातील शाहू विद्यालयात यशस्विनीराजे यांचे प्राथमिक, तर विबग्योर स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. पुढे त्यांनी मुंबईतील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलमधून (आयबी) बारावी पूर्ण केली. पदवीच्या शिक्षणासाठी त्यांनी परदेशात जावे, अशी शाहू छत्रपती यांची इच्छा होती. त्यानुसार यशस्विनीराजे यांनी लंडनमध्ये शिक्षण घेण्याचे ठरवून तेथील रिजेन्टस युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी प्रवेश घेतला. त्यांना परदेशात जाऊन उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी शाहू छत्रपती यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन लाभले.
चौकट
छत्रपती घराण्यांचे स्त्रीशिक्षणाला बळ
राजर्षी शाहू महाराज यांचे स्त्रीशिक्षणाला पाठबळ होते. राजघराण्यातील स्त्रियांना त्या काळात शिक्षणासाठी त्यांनी ट्यूटरची सोय केली होती. आक्कासाहेब महाराज, इंदुमती राणीसाहेब, पद्माराजे यांनी इंग्रजी आणि इतर विषयांमध्ये प्रावीण्य मिळवले होते. राजर्षी शाहू महाराज यांनी परदेशातून शिक्षण घेतले. राजाराम महाराज, प्रिन्स शिवाजी महाराज हे देखील शिक्षणासाठी परदेशात गेले होते. पण, महायुद्धामुळे त्यांना परत यावे लागले. शाहू छत्रपतींना शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्याकडे संस्थानच्या पदभाराची जबाबदारी आल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे कित्येक वर्षांनी छत्रपती घराण्यातील यशस्विनीराजे यांनी परदेशातून शिक्षण घेतले. त्यांना शाहू छत्रपती आणि कुटुंबीयांचे मोठे पाठबळ लाभले.
प्रतिक्रिया
कोरोनाच्या कालावधीतही यशस्विनीराजे यांनी लंडनमध्ये राहून स्वत:ला सिद्ध केल्याचा आमच्या सर्व कुटुंबाला आनंद, अभिमान आहे. परदेशात मिळविलेल्या पदवीपेक्षाही त्यांच्यामध्ये वाढलेले धैर्य, आत्मविश्वास, क्षमता, कुटुंबासह इतरांबाबतची आपुलकी हे अधिक महत्त्वाचे आहे. छत्रपती घराण्याची परंपरा त्यांनी जोपासली आहे. पुढे त्या पदव्युत्तर शिक्षण घेणार आहेत. मुलांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेण्यासाठी त्यांना मोठ्या महाराजांसह आम्हा सर्वांचे पाठबळ आहे.
- मालोजीराजे छत्रपती
फोटो (२००८२०२१-कोल-यशस्विनीराजे छत्रपती)
200821\20kol_2_20082021_5.jpg
फोटो (२००८२०२१-कोल-यशस्विनीराजे छत्रपती)