यड्रावच्या युवकांचा रेसिंगमध्ये झेंडा
By Admin | Updated: February 25, 2015 00:39 IST2015-02-24T21:31:10+5:302015-02-25T00:39:07+5:30
डर्ट ट्रॅक रेसमध्ये अजिंक्यपद : वेगवेगळ्या प्रकारात दाखविली आठ खेळाडूंनी चमक

यड्रावच्या युवकांचा रेसिंगमध्ये झेंडा
यड्राव : येथील युवकांनी राष्ट्रीय डर्ट ट्रॅक रेसमध्ये पाचही प्रकारात चमक दाखवून यश मिळविले आहे. कर्नाटकमधील मुगळी (ता. चिकोडी) येथे या स्पर्धा झाल्या. यड्राव संघाकडून आठ खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता.मुगळी (ता. चिकोडी) येथील बसवेश्वर यात्रा कमिटी व श्री गजानन रेसिंग असोसिएशन यांच्यावतीने डर्ट रेस ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ८०० मीटर ट्रॅकमध्ये सात लॅप्स यानुसार प्रत्येक प्रकारात स्पर्धा फेरी झाल्या. मुंबई, गोवा, पुणे, सांगली, मिरज, हुबळी, धारवाड, बेळगाव, विजापूर येथील स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता.यड्रावच्या संघातील स्पर्धकांनी पुढीलप्रमाणे यश मिळविले आहे. नोव्हाईस प्रकारात गणेश आडके प्रथम, ओपन क्लासमध्ये युवराज बरकत द्वितीय, तर वाजीद बैरागदार याने तृतीय क्रमांक, टू स्ट्रोकमध्ये वासीम बैरागदार याने तृतीय क्रमांक व वाय. बी. एक्स १२५ प्रकारात हेमंत साने यांनी चमकदार खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धकांना दिलावर बैरागदार, सुमित येवारे व सुशांत येवारे यांचे मार्गदर्शन लाभले, तर सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रोत्साहन मिळाले.विजेत्या स्पर्धकांना आडव्याप्पा आगसर, शेखर होसमनी, रावसाहेब पाटील, तम्मा बंबलवाडी, अलगोंडा पाटील, सदाशिव आगसर, दत्तू बडीगरे, बाबू पाटील, चंद्रकांत बंबलवाडी, रावसाहेब पाटील यांच्या हस्ते चषक व रोख रक्कम देण्यात आली. (वार्ताहर)