यड्रावचे आरोग्य उपकेंद्र अंधारात
By Admin | Updated: February 20, 2015 23:14 IST2015-02-20T21:28:14+5:302015-02-20T23:14:47+5:30
विद्युत पुरवठा खंडित : जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष, महिन्यापासून अंधारात उपचार सुरू

यड्रावचे आरोग्य उपकेंद्र अंधारात
यड्राव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे विद्युत बिल थकल्याने महावितरणने विद्युतपुरवठा खंडित केला आहे. सुमारे महिन्याभरापासून येथे अंधारात उपचार सुरू आहेत. अंधारामुळे चुकीचे औषध व मात्रा यामध्ये फरक पडल्यास रुग्णावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असूनही जिल्हा परिषद याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांना रोषास सामोरे जावे लागत आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना आरोग्याच्या प्राथमिक आजारांवर उपचार तसेच महिलांच्या प्रसूतीबाबत उपचार करण्यात येतात. जिल्हा परिषदेकडून आरोग्य उपकेंद्रांना विद्युत बिलासाठी देण्यात येणारा निधी एप्रिल २०१४ पासून आलेला नाही; परंतु आज ना उद्या रक्कम येईल या आशेने स्थानिक कर्मचाऱ्यांनी विद्युत बिलाची रक्कम स्वत:च्या पगारामधून काढून भरली आहे.आठ महिने स्वत:च्या पगारातून रक्कम भरूनही जिल्हा परिषदेकडून विद्युत बिल मिळत नसल्याने लाईट बिलासाठी रक्कम भरणे बंद केले आहे. जानेवारीपासून आरोग्य उपकेंद्रामध्ये रात्रीच्या वेळेनंतर अंधारामध्येच उपचार करण्यात येत आहेत. अंधारामध्ये औषधाच्या गोळ्या, त्या घेण्याचे प्रमाण किंवा प्रसूतीसाठी महिला दवाखान्यात आली तर त्याचे रुग्णांवर विपरित परिणाम होऊ शकतो. चुकीच्या औषधाने होणारे दुष्परिणाम वेगळा आजारही उत्पन्न करू शकतो. या अंधाराचा जास्त तोटा रुग्णावर होऊ शकतो व त्याचे दुष्परिणाम कर्मचाऱ्यांना भोगायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.आरोग्य उपकेंद्रामध्ये प्राथमिक उपचार चोवीस तास देणे बंधनकारक असतानाही येथील कर्मचाऱ्यांना अंधारामुळे उपचार सेवा देणे गैरसोयीचे व अडचणीचे झाले आहे, तर स्वत:च्या पगारातून किती दिवस लाईट बिलासाठी रक्कम बाजूला काढायची यासाठी मर्यादा येत आहे. जिल्हा परिषदेचा हलगर्जीपणा उपचारासाठी धोकादायक बनला आहे. कर्मचाऱ्यांना स्वत:च्या खिशातील पैसे लाईट बिलासाठी द्यायचे की रुग्णांच्या योग्य प्राथमिक उपचारासाठी लक्ष द्यायचे. अंधारामुळे चुकीचे औषध गेले की दोष कर्मचाऱ्यांचा, रुग्णाच्या रोषास कसे सामोरे जायचे या चक्रात आरोग्य कर्मचारी अडकला आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यातील उपकेंद्रे अंधारात
जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांना एप्रिल २०१४ पासून विद्युत बिल भरण्यासाठी रक्कम मिळाली नसल्याने ती अंधारात आहेत. याकडे वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने पाहत नसल्याने स्थानिक कर्मचारी अडचणीत आले असून, रुग्णांवर उपचार करायचा की, स्वत: पगारातून पैसे गोळा करून वीज बिल भरायचे, असा संभ्रम कर्मचाऱ्यांत निर्माण झाला आहे.
टप्प्याटप्प्याने निधी
तालुका केंद्राला आलेल्या निधीमधून तालुक्यातील ३३ आरोग्य उपकेंद्रांना लाईट बिलासाठी थोडा थोडा निधी वर्ग करण्यात आला आहे. तो एक दोन दिवसांत त्यांना मिळेल. पुन्हा निधी आल्यावर उर्वरित निधी उपकेंद्रांना देण्यात येणार आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद दातार यांनी सांगितले.