ए. वाय. जिल्हाध्यक्ष; लाटकर शहराध्यक्ष

By Admin | Updated: May 30, 2015 01:02 IST2015-05-30T01:00:28+5:302015-05-30T01:02:16+5:30

राष्ट्रवादीच्या निवडी : प्रदेश उपाध्यक्षपदी मुश्रीफ

A. Y District President; City Head | ए. वाय. जिल्हाध्यक्ष; लाटकर शहराध्यक्ष

ए. वाय. जिल्हाध्यक्ष; लाटकर शहराध्यक्ष


कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)पदी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांची निवड झाली. शहराध्यक्षपदी नगरसेवक राजू लाटकर यांचीही शुक्रवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवड जाहीर केली. त्याचबरोबर आमदार हसन मुश्रीफ यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया डिसेंबर २०१४ पासून सुरू होती. ब्लॉक कमिट्यांपासून जिल्हा कार्यकारिणी सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांच्या नावांची शिफारस ‘प्रदेश’कडे करण्यात आली होती. शुक्रवारी मुंबईत प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष म्हणून ए. वाय. पाटील यांची तर शहराध्यक्ष म्हणून राजू लाटकर यांची तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून हसन मुश्रीफ यांची निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्षपदासाठी ए. वाय. पाटील यांच्यासह राजेंद्र पाटील-यड्रावकर, मानसिंग गायकवाड यांच्या नावांची चर्चा होती, पण जिल्ह्णातील नेत्यांनी के. पी. पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती. शहराध्यक्षपदासाठी आर. के. पोवार, राजू लाटकर व आदिल फरास यांच्या नावाची चर्चा होती पण पोवार यांनी जोरदार ताकद लावली होती. पक्षाच्या स्थापनेपासून १९९९ पासून पोवार हे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे बदल करून तरुण कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी मागणी पक्षातून होती. त्यातच आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आक्रमक व तडजोडी करणारा चेहरा द्यावा, असा दबावही कार्यकर्त्यांचा होता. त्यातूनच लाटकर यांचे नाव पुढे आले.
‘के. पीं.’चा पत्ता कट
पक्षनिरीक्षक दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १५ एप्रिलला जिल्हाध्यक्ष म्हणून के. पी. पाटील यांची एकमताने निवड केली होती. जिल्हाध्यक्षपदासाठी दुसरे सक्षम नाव नसल्याने हसन मुश्रीफ यांनी त्यांचे नाव सुचविले होते, पण ऐनवेळी ए. वाय. पाटील यांचे नाव पुढे आल्याने यामागे जिल्हा बँक अध्यक्षपदाचे राजकारण असल्याचे बोलले जात आहे.

पक्षाने शहराध्यक्षपदाची जबाबदारी देऊन माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केला आहे. आगामी काळात ज्येष्ठ, युवकांबरोबर सर्वांना बरोबर घेऊन एकोप्याने पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. महापालिका निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार आहे.
- राजू लाटकर, नूतन शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाध्यक्षांनी दिलेल्या संधीचे सोने करत आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, खासदार धनंजय महाडिक, निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह पक्षाच्या सर्व नेते, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्ष बळकटीसाठी काम करणार आहे. ज्या तालुक्यात पक्ष कमकुवत आहे, तेथील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम प्राधान्याने करू.
- ए. वाय. पाटील, नूतन जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

दहा वर्षे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदावर काम करणाऱ्यांना बदलण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतल्यानेच के. पी. पाटील व आर. के. पोवार यांच्याऐवजी ए. वाय. पाटील व राजू लाटकर यांची निवड करण्यात आली.
- हसन मुश्रीफ, आमदार

Web Title: A. Y District President; City Head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.