कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापन बघणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकृत वेबसाइटवरच देवीच्या इतिहासाविषयी चुकीची माहिती येत आहे. यात आक्षेपार्ह शब्द आणि मजकूर असून, वेगवेगळ्या देवींची तिसरीच माहिती फिरवून संदिग्ध केली आहे. मंदिराशी संबंध नसलेली माहिती घुसडली असून हा प्रकार तब्बल १३ वर्षांनी लक्षात आला आहे. याविरोधात प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी आक्षेप घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी शुक्रवारी केली आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकृत वेबसाइटवरील मंदिराचा इतिहास या हेडखाली धर्म प्रोटोकॉल अंतर्गत ही माहिती प्रसिद्ध केली आहे. कोणत्याही सर्वसामान्य भक्ताला कळूच नये, अशा पद्धतीने सर्व संदिग्ध शब्द या माहितीत वापरले असून, त्यात वारंवार देवीचे स्वरूप लक्ष्मीचे आहे, लज्जागौरी, गजलक्ष्मी, राजलक्ष्मी आहे. ती विष्णू पत्नी आहे, कमळावर बसली आहे, असा उल्लेख त्यात आहे. त्यासाठी कोण्या एका हद्दपार राजाचा संदर्भ दिला आहे. पुढे हीच पद्मावती, मायादेवी असल्याचेही म्हटले आहे. शिवाय देवीच्या मूर्तीचे चुकीचे वर्णन केले आहे.
चुकीची माहिती अपलोड केली कुणी ?
- कोल्हापुरात पाैराणिक इतिहासाचे तज्ज्ञ, अभ्यासक, वेदमूर्ती असून अंबाबाईवर पुस्तकेदेखील प्रकाशित केली आहेत. तरीही आक्षेपार्ह आणि चुकीची माहिती वेबसाइटवर अपलोड केली कुणी?
- गेली १३ वर्षे कुणीही यावर आक्षेप कसा घेतला नाही ?
- समितीच्या धर्मशास्त्र अभ्यासकांची माहिती तपासण्याची जबाबदारी नव्हती का?
- समितीचा माहितीवर आक्षेप होता तर त्यांनी आधीच ती डिलिट का केली नाही ?
- चुकीची माहिती दिलेल्या व्यक्तीवर कारवाई होणार का?
अंबाबाई मंदिराचा इतिहास बदलला जात असताना, कोल्हापूरकरांनी आंदोलने, प्रबोधन करून तो डाव हाणून पाडला आहे; पण देवस्थानकडूनच चुकीची माहिती दिली जात असेल, तर अवघड आहे. या बेवसाइटवर अंबाबाई मंदिराची चुकीची माहिती कोणी टाकली, याचा शोध घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. - दिलीप देसाई, प्रजासत्ताक संस्था
वेबसाइट सुरू झाली त्यावेळी कुणी तरी ही माहिती अपलोड केली आहे; मात्र यावर समितीचाच आक्षेप आहे. त्यामुळे मंदिरातील १० शिलालेखांच्या आधारे नवी माहिती लिहिली जात असून, तातडीने ती वेबसाइटवर अपलोड केली जाईल. - शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर.