कारवाईच्या लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:22+5:302021-09-10T04:31:22+5:30
कबनूर : बांधकाम परवानाबाबत ग्रामपंचायत कबनूरकडून बोगस दाखला देणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे लेखीपत्र उपोषणकर्ते ...

कारवाईच्या लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे
कबनूर : बांधकाम परवानाबाबत ग्रामपंचायत कबनूरकडून बोगस दाखला देणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे लेखीपत्र उपोषणकर्ते शांतीनाथ कामत व अजित खुडे यांना सरपंच शोभा पोवार व ग्रामसेवक बी. टी. कुंभार यांच्या स्वाक्षरीने दिल्याने बनावट बांधकाम परवान्याबाबत सुरू असलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली.
येथील गट क्रमांक १०२८ मधील इरगोंडा म्हादगोंडा पाटील यांचे नावे दिलेल्या बनावट बांधकाम परवान्यावर ग्रामपंचायतीने कायदेशीर कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ येथील सामाजिक कार्यकर्ते शांतिनाथ कामत व अजित खुडे यांनी मंगळवारी (दि.७) सकाळपासून मुख्य चौकातील कट्ट्यावर आमरण उपोषण सुरू केले होते. या वेळी सरपंच पोवार व ग्रामविकास अधिकारी कुंभार यांनी परवाना रद्द केल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना दाखवले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, उपोषणकर्त्यांनी बनावट बांधकाम परवानासंदर्भात कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष पवार, सरपंच पोवार, ग्रामविकास अधिकारी कुंभार यांनी उपोषणकर्त्यांना परवान्याबाबत ग्रामपंचायत कबनूरकडून बोगस दाखला देणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करीत असल्याचे पत्र दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच मधुकर मणेरे, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, ग्रा.पं.सदस्या वैशाली कदम, नीलेश पाटील, प्रा. अशोक कांबळे, नितीन काडाप्पा, संजय कट्टी, अल्ताफ मुजावर, सुधाकर महाडिक आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
०९०९२०२१-आयसीएच-०१
कबनूर (ता. हातकणंगले) येथील बोगस बांधकाम परवानाबाबत ग्रामपंचायतीकडून बोगस दाखला देणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत असल्याचे पत्र सरपंच शोभा पोवार व ग्रामविकास अधिकारी बी. टी. कुंभार यांनी उपोषणकर्त्यांना दिले.