जातीच्या भिंती ओलांडून सासनकाठीची पूजा

By Admin | Updated: April 3, 2015 00:47 IST2015-04-02T21:24:31+5:302015-04-03T00:47:45+5:30

कोल्हापूरच्या शेख कुटुंबीय. कागल शिंदेवाडी गावातून येणाऱ्या सासनकाठीचा मुक्काम या मुस्लिम कुटुंबाकडे असतो. हे कुटुंब दोन दिवस या सासनकाठीच्या सेवेत तल्लीन असते.

The worship of Sasarkathi across the caste walls | जातीच्या भिंती ओलांडून सासनकाठीची पूजा

जातीच्या भिंती ओलांडून सासनकाठीची पूजा

जहाँगीर शेख - कागल-- राजर्षी शाहूंच्या करवीर नगरीत एकमेकांच्या धार्मिक सोहळ्यात जात-धर्म बाजूला टाकण्याची परंपरा नवी नाही. अशी अनेक कुटुंबे आहेत की, अशा धार्मिक परंपरेतील पुरोगामी विचारांची प्रतीकेच बनली आहेत. त्यापैकीच कोल्हापूरच्या पंचगंगा घाटाजवळ राहणारे शेख कुटुंबीय. कागल तालुक्यातील शिंदेवाडी या गावातून येणाऱ्या सासनकाठीचा मुक्काम दोन दिवस या मुस्लिम कुटुंबाकडे असतो. हे कुटुंब दोन दिवस या सासनकाठीच्या सेवेत तल्लीन झालेले असते. सासनकाठीचे मानकरी खराडे कुटुंबीय आणि शेख कुटुंबीयांनी गेली अनेक वर्षे ही परंपरा जपली आहे.
दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेत शिंदेवाडीहून खराडे कुटुंबीयांची ही मानाची सासनकाठी येते. गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या आधी दोन दिवस ही पालखी पायी प्रस्थान करते. पहिला मुक्काम कात्यायनीच्या मंदिरात होतो, तर दुसऱ्या दिवशी पंचगंगा घाटाजवळील गायकवाड वाड्याजवळील महादेव मंदिरात या सासनकाठीचे आगमन होते. तेथे राहणारे शौकतअली शेख यांचे कुटुंबीय या सासनकाठीचे पूजन करतात. नैवेद्य तयार करतात. पालखीसोबत आलेल्या ३० ते ३५ लोकांसाठी जेवण, चहा, नाष्टा बनवितात. दुसऱ्या दिवशी ही सासनकाठी डोंगरावरील सोहळ्यात सहभागी होऊन परत मुक्कामासाठी येते. सासनकाठीच्या या सेवेसाठी शेख परिवारातील सर्व सदस्य दोन दिवस सणासारखे सहभागी होतात. पिढ्यान्-पिढ्या चालत आलेली परंपरा त्यांनी आजही जपली आहे. ही श्री जोतिबाची सासनकाठी बंधुभावाच्या शाश्वत श्रद्धेची सासनकाठी ठरली आहे.


एक वेळ अशी आली की, आमच्या ईदच्या सणादिवशीच चैत्र यात्रा येऊन ही सासनकाठी आली. ती ईद आम्ही पूर्ण शाकाहारी बनविली आणि सासनकाठीसोबत आलेल्या भाविकांना ‘शिरखुर्मा’ही दिला.
- शौकत शेख


आमच्या वाडवडिलांपासून ही परंपरा चालू आहे. कोल्हापुरातील या दोन दिवसांच्या मुक्कामामध्ये शेख कुटुंबीय घरच्याप्रमाणे चहापाणी, नाष्टा, जेवण, साहित्याची जपणूक करतात. गोडधोड जेवण आणि नैवेद्यही तयार करतात. आमच्या खराडे कुटुंबीयांत आणि शेख कुटुंबीयांत जात-पात-धर्माचे अंतर उरलेले नाही. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन एक जिव्हाळा तयार झाला आहे.
- दयानंद खराडे (शिंदेवाडी), मानकरी.

६५ वर्षीय महंमदअली शेख सांगतात की, आमचे आजोबा अल्लीसाहेब हे राजर्षी शाहूंच्या दरबारात ‘वकील’ होते. त्यांच्याही पूर्वीपासून आमचे कुटुंब ही सेवा बजावत आहेत.
आता शौकत आणि त्यांची पत्नी शफियाबी आणि त्यांची मुले तोहिद, नियाज हे ही परंपरा पुढे नेत आहेत.
चैत्र यात्रा सुरू झाली की, आमचे सर्व लक्ष शिंदेवाडीच्या या सासनकाठीच्या आगमनाकडे लागलेले असते, तर शौकत शेख म्हणाले, आमचे हे नाते केवळ चैत्र यात्रेपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आम्ही नेहमीच एकमेकांच्या सुख-दु:खाच्या कार्यक्रमातही सहभागी होत आलो आहोत.


शिंदेवाडीच्या सासनकाठीच्या सेवेची परंपरा सध्या जपत असलेले शौकत आणि शफियाबी शेख.

Web Title: The worship of Sasarkathi across the caste walls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.