विश्वशांती पदयात्रा शुक्रवारी सिंधुदुर्गात
By Admin | Updated: December 30, 2014 23:33 IST2014-12-30T21:25:43+5:302014-12-30T23:33:47+5:30
जिल्ह्यात होणार स्वागत : थायलंडच्या १०० भिक्खू संघांचा सहभाग

विश्वशांती पदयात्रा शुक्रवारी सिंधुदुर्गात
खारेपाटण : मुच्छलिंदा इंटरनॅशनल विपश्यना सेंटर बोधगया व संघमित्रा गंधकुटी बुद्धविहार ट्रस्ट प्राचीन बुद्ध स्तुप नालासोपारा यांच्या विद्यमाने विश्वशांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या निमित्ताने थायलंड येथील १०० पूजनीय भिक्खू संघ आणि उपासक उपासिका शुक्रवारी (दि. २) सायंकाळी ५ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत.
या पदयात्रेचे स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर मुंबई-गोवा हायवे येथे बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या १२ गाव संघटनेच्यावतीने करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने वैभववाडी बौद्धसेवा व देवगड तालुका बौद्ध सेवा संघ व बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या धार्मिक संघटनांच्या सभासद, प्रमुख कार्यकर्त्यांच्यावतीने खारेपाटण हायवेवर या पदयात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.
सायंकाळी ७.३० वाजता उपस्थित बौद्ध बांधवांना धम्मदेसना अर्थात धम्म प्रवचन या विश्वशांती पदयात्रेतील प्रमुख भन्तेजी करणार आहेत.
शनिवारी (दि. ३) सकाळी ६ वाजता गोव्याच्या दिशेने ही पदयात्रा पुढे जाण्याकरिता निघणार आहे. तरी या ऐतिहासिक पदयात्रेत सर्व बौद्ध बांधवांनी सहभाग घ्यावा व विश्वशांती पदयात्रेचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात यावे, असे आवाहन बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण संघटनेचे अध्यक्ष यशवंत कांबळे यांनी केले आहे. (वार्ताहर)
खारेपाटण येथे मुक्काम
भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक प्राचीन बुद्ध स्तुप नालासोपारा येथून १५ डिसेंबरपासून या पदयात्रेस प्रारंभ झाला असून, ही विश्वशांती पदयात्रा मुंबई-गोवा या महामार्गावरून जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता खारेपाटण येथे ही पदयात्रा मुक्कामी येणार आहे.