संदीप आडनाईककोल्हापूर : जुन्या पिढीतील छायाचित्रकार काम मिळत नाही अशी तक्रार करत असतानाच जुन्या पिढीतील छायाचित्रकार नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालत छायाचित्रण कलेत नाव कमावत आहेत. कोल्हापुरातील ६५ वर्षांचे रघू जाधव यांचे नाव यासाठी घ्यावे लागेल.रघू जाधव टेबल टॉप आणि ट्रीक फोटोग्राफीसाठी आजही कोल्हापुरात ओळखले जाणारे छायाचित्रकार आहेत. १९८५ मध्ये जीडीआर्ट पदवी घेतलेले रघू जाधव यांनी १९९५ पर्यंत जाहिरातीसाठी डिझायनिंगचा व्यवसाय केला. त्यातील फोटोग्राफीसाठी त्यांना ओळखले जाई. फोटोग्राफी हा व्यवसाय आणि छंदपण त्यांनी नंतर जोपासला. त्यांनी निगेटिव्हच्या जमान्यापासून आताच्या डिजिटल फोटोग्राफीपर्यंत मजल मारली आहे.आता एआयच्या तंत्रज्ञानातून नव्या पद्धतीच्या छायाचित्रणातही ते अग्रेसर आहेत. यासाठी त्यांनी स्वत:ला बदलून घेतले. फोटो एडिट करण्याचे तंत्रज्ञान नव्हते तेव्हा त्यांनी ट्रीक फोटोग्राफीतून धमाल उडवून दिली होती. यापुढचा काळ ओळखून त्यांनी पुढची पावले टाकली आणि स्वत:चा स्टुडिओ उभारला. अत्याधुनिक कॅमेऱ्यातूनही चौकट बदलून टाकणारी फोटोग्राफी त्यांनी केली. आजही इव्हेंट फोटोग्राफीसाठी ते आजच्या पिढीसोबत तितकेच लोकप्रिय आहेत.फोटोग्राफीचे डॉक्युमेंटेशनलोकजीवन हे त्यांच्या फोटोग्राफीचे वैशिष्ट्य आहे. १९९० मध्ये कणेरी मठावरील बारा बलुतेदाराची संकल्पना उभारून त्यांनी मालिका केली. पुढे गुऱ्हाळघरापासून ते गूळ बाजारपेठेत विकला जाईपर्यंतची मालिका त्यांनी पुढे आणली. कष्टकरी स्त्रिया, मुलांचे हरवलेले खेळ असे अनेक विषय त्यांनी डिजिटल फॉरमॅटमध्ये आणले. १९९४ मध्ये त्यांनी कला प्रयोगाच्या माध्यमातून सहकारी संजय दैव आणि प्रकाश अथणे यांच्यासोबत नवा प्रयोग केला. त्याचे डॉक्युमेंटेशन केले. चित्रफीत आणि पुस्तकाच्या माध्यमातून ती उपलब्ध आहे.
सोशल मीडियावर कार्यरतरघू जाधव आजही सोशल मीडियावर कार्यरत आहेत. त्यातून मिळणाऱ्या अनेक स्टोरीज, रीलमधून त्यांना नव्या संकल्पना मिळतात. तरुण मुलांसोबत काम करत त्यांनी नवे तंत्रज्ञान समजून घेतले. अनुभव आणि तंत्रज्ञानाची त्यांनी सांगड घातली आहे.नवा प्रयोग पुढच्या वर्षातकला प्रयोगाच्या माध्यमातून रघू जाधव पुढील वर्षी एक प्रयोग प्रदर्शनाच्या रूपात मांडणार आहेत. पन्नास वर्षांपूर्वीचे वातावरणनिर्मिती करणारी छायाचित्रांची मालिका यातून ते सर्वांसमोर आणणार आहेत. हा काेल्हापुरातील पहिला प्रयोग असेल.