गरोदर मातांच्या लसीकरणाबाबत कार्यशाळा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:49+5:302021-07-18T04:18:49+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात गरोदर महिलांना कोविड लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ...

गरोदर मातांच्या लसीकरणाबाबत कार्यशाळा पार
कोल्हापूर : जिल्ह्यात गरोदर महिलांना कोविड लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना फॉक्सी, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन पेडिॲट्रिक असोसिएशन या खासगी क्षेत्रातील वैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संवेदीकरण कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात घेण्यात आली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सरवदे, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. आशा जाधव, उपाध्यक्ष डॉ. गीता पिलाई, स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या सचिव डॉ. सुरुची पवार व डॉ. दीपाली पाटील, कोल्हापूर बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या अघ्यक्ष डॉ. संगीता कुंभोजकर, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यसंपर्क डॉ. हर्षला वेदक, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई, मनपा लसीकरण अधिकारी डॉ. अमोल माने, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विलास देशमुख, डॉ. विद्या काळे व सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम उपस्थित होते.
उपलब्ध कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुटनिक या तीनही लसी गरोदर महिलांसाठी सुरक्षित आहेत. गरोदरपणाच्या कोणत्याही कालावधीत कोविड लसीकरण करून घेणे गरोदर मातेस सुरक्षित आहे. या सर्वांचे लसीकरणापूर्वी समुपदेशन केले जाणार आहे. लसीकरणाला येताना माता बाल संगोपन कार्ड सोबत आणण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील वर्षाला एकूण ६८ हजार ३४७ गरोदर मातांना आरोग्यसेवा दिली जाते. त्यांना टप्प्याटप्प्याने कोविडचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
चौकट
या लसीकरणाची सुरुवात पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात दर सोमवारी सकाळी १० ते २ यावेळेत खालील ठिकाणी करण्यात येणार आहे. याठिकाणी १०० गरोदर मातांना कोविडचे लसीकरण करण्यात येणार आहे.
चौकट
येथे होणार लसीकरण
ग्रामीण रुग्णालय, आजरा
ग्रामीण रुग्णालय, कागल
ग्रामीण रुग्णालय, भुदरगड
उपजिल्हा रुग्णालय गांधीनगर
ग्रामीण रुग्णालय, चंदगड
ग्रामीण रुग्णालय, पन्हाळा
उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज
प्रा. आ. केंद्र तारळे
ग्रामीण रुग्णालय, गगनबावड
ग्रामीण रुग्णालय, मलकापूर
ग्रामीण रुग्णालय, हातकणंगले
ग्रामीण रुग्णालय, शिरोळ
युपीएचसी लालनगर कोल्हापूर
पंचगंगा हॉस्पिटल कोल्हापूर