कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीव -रसुरक्षा साधनांची वानवा : वर्षभरात विभागामध्ये १४ कामगार मृत, तर १८ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:10 AM2018-06-21T01:10:57+5:302018-06-21T01:10:57+5:30

Workers' safety question: Anecdote: 14 workers died in the department during the year and 18 injured | कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीव -रसुरक्षा साधनांची वानवा : वर्षभरात विभागामध्ये १४ कामगार मृत, तर १८ जखमी

कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीव -रसुरक्षा साधनांची वानवा : वर्षभरात विभागामध्ये १४ कामगार मृत, तर १८ जखमी

Next

सतिश पाटील ।
शिरोली : एमआयडीसीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या एक वर्षातील विविध अपघातात कोल्हापूर विभागात १४ कामगार मृत झाले; तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह फक्त नावालाच साजरा होतो. शिरोली एमआयडीसीमध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एका कामगाराला जीव गमवावा लागला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा कार्यालयाशी संपर्क साधला असता गेल्या वर्षभरात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोल्हापूर विभागात झालेल्या अपघातात निष्पाप १४ कामगारांचा बळी गेला आहे, तर १८ कामगार गंभीर जखमी होऊन जायबंदी झाले आहेत .

पश्चिम महाराष्ट्र हा फौंड्री आणि कोकणच्या काजू उद्योगासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या पश्चिम महाराष्ट्रात सुमारे दहा हजारांहून अधिक कारखाने आहेत; पण औद्योगिक सुरक्षा कार्यालयाकडे फक्त तीन हजार कारखान्यांचीच नोंद आहे. उर्वरित कारखान्यांची नोंदच नाही. कंपनीत कामगार काम करीत असताना त्याला सुरक्षेसाठी डोक्याला हेल्मेट, हॅन्डग्लोज, गमबूट, डोळ्यांना घालण्यासाठी गॉगल, इमारतींवर चढण्यासाठी पाळणा, शिडी, लिफ्ट यांसारख्या सुरक्षेची साधनसामुग्री कंपनीतील प्रशासनाने देणे बंधनकारक आहे. याचा कामगारांनी वापर करणे हे ही बंधनकारक आहे. तसेच प्राथमिक उपचारासाठी कंपनीत डॉक्टर ठेवणे हा ही नियम आहे. पण, बऱ्याच कंपनीत कामगारांना सुरक्षेसाठी काहिच दिले जात नाही. फक्त काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या मोठ्या कंपनीतील कामगारांना सुरक्षा किट दिले जाते. अनेक ठिकाणी कामगारांना सुरक्षा किट दिले जाते; पण कामगार ते ही घालण्यास टाळाटाळ करतात.

कंपनी प्रशासनाने कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा किट दिले पाहिजे. ज्या वेळी एखादा अपघात होईल तेव्हा त्या कामगाराला कोणतीही ईजा होणार नाही याची जबाबदारी कंपनी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. हा शासनाचा नियम आहे; पण हा नियम पूर्णत: पायदळी तुडवला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठा फौड्री उद्योग आणि काजू उद्योग हा कामगारांवर अवलंबून आहे. याच कामगारांनी हा उद्योग जगभरात सातासमुद्रापार पोहोचविला आहे; पण हा उद्योग एवढ्या उंचीवर पोहोचविण्यात कामगारांचा मोठा वाटा आहेच. आज मात्र याच कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे.


 

चार दिवसांपूर्वी शिरोली एमआयडीसीमध्ये झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटाची पुर्ण चौकशी केली जाणार आहे. तसेच औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी कामगारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. कामगारांना सर्व सुरक्षा पुरविली पाहिजे. जे उद्योग कामगारांना सुरक्षा पुरविण्यास कमतरता दाखवत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- सी. व्ही. लभाणे, सहसंचालक,
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग.

एमआयडीसीत काम करणारा कामगार आज सुरक्षित नाही. वारंवार अपघात होत आहेत. यात कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. काही ठराविक कंपन्यांमध्येच कामगारांच्या आरोग्याची सुरक्षेबाबत काळजी घेतली जाते. याबाबत सर्व कामगार युनियन लवकरच लेबर कमिशनर व जिल्हाधिकारी यांना भेटणार आहोत .
-क्रॉम्रेड इम्रान इलाई जंगले,
कोल्हापूर जनरल कामगार युनियन, लालबावटा जनरल सेक्रेटरी.


मालक लोकांनी कामगारांना सुरक्षा ही दिलीच पाहिजे. कंपनीत काम करणारा कामगार हाच कंपनीचा कणा आहे. कामगार सुरक्षित तर कंपनी सुरक्षित त्यामुळे प्रत्येक मालकांने कामगारांना सुरक्षा दिली पाहिजे. एक वर्षापूर्वी स्मॅकच्यावतीने दवाखाना सुरू केला आहे. त्याचाही उद्योजक आणि कामगारांनी लाभ घ्यावा.
- राजू पाटील, स्मॅक अध्यक्ष

Web Title: Workers' safety question: Anecdote: 14 workers died in the department during the year and 18 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.