गरिबांसाठीच्या चुली कर्मचाऱ्यांनी पळविल्या
By Admin | Updated: November 9, 2015 23:41 IST2015-11-09T20:55:50+5:302015-11-09T23:41:54+5:30
एकच धांदल : भुदरगड पंचायत समितीमधील आततायीपणाचा कळस

गरिबांसाठीच्या चुली कर्मचाऱ्यांनी पळविल्या
शिवाजी सावंत-- गारगोटी -‘मिळे फुकटात, सुटे मोकाट’ या म्हणीने स्वत:ची यथार्थता पटवली आहे. ही म्हण भुदरगड पंचायत समितीचे कर्मचारीसुद्धा खोटे ठरवू शकले नाहीत. गरिबांच्या घरकुलासाठी आलेल्या चुली पळवण्यासाठी एकच धांदल केली. त्यांच्या या कृतीने पंचायत समिती काही कर्मचाऱ्यांचा आततायीपणा उघडा पडला आहे. तालुक्यात २०१५ सालाकरिता इंदिरा आवास योजनेतून ३८३ घरे मंजूर झाली आहेत. त्यापैकी २४१ घरकुलांची कामे पूर्णत्वाकडे आहेत. या घरकुलधारकांना शासनाकडून लोखंडी चुली पुरविण्यात येतात. त्यातील सुमारे दोनशे चुली लाभधारकांनी अद्याप नेल्याच नसल्याने पंचायत समितीत आहेत. सध्या पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने हे साहित्य ठेवण्यासाठी गोडाऊन नाही म्हणून कृषी विभागाच्या मागील खोलीत व पशुसंवर्धन खात्याच्या मागील बाजूस असणाऱ्या खोलीत ठेवले होते. अचानक पुणे आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाच्या पंचवार्षिक तपासणीस सुरुवात झाली. त्यामुळे साहित्याचे एकत्रिकरणासाठी नेत असताना काही कर्मचाऱ्यांना वाटले की या चुली ज्याला सापडतील तो नेता आहे, अशा गैरसमजुतीतून अनेकांनी या चुली नेऊन आपआपल्या खात्यातील टेबलाखाली ठेवल्या. नेमके काय हे संबंधित कर्मचाऱ्यांना लवकर समजेना. त्यांना वाटले हे सर्व कर्मचारी एकत्रिकरणासाठी मदत करीत आहेत, पण जेव्हा चुली कमी दिसू लागताच त्यांच्या लक्षात घडलेला प्रकार आला. ज्यांच्यावर या साहित्याची जबाबदारी आहे त्यांना घाम फुटला. त्यांनी तातडीने शिपायांना पाठवून सर्व चुली जमा केल्या. न पेटवलेल्या चुलीची धग काय असते, हे अवघ्या अर्ध्या तासात संबंधितांनी अनुभवले. स्वभावातील दोष माणूस कितीही मोठा असला तरी बदलत नाहीत की काय? अशी शंका पंचायत समितीच्या आवारातून फिरणारे नागरिक व्यक्त करीत होते. या पळवापळवीने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.