मंडलिकांच्या स्मारकाला कष्टकऱ्यांचा ‘हात’

By Admin | Updated: October 1, 2015 00:38 IST2015-10-01T00:02:46+5:302015-10-01T00:38:22+5:30

दोन वर्षांत अडीच कोटींचा निधी : चिरकाल टिकणार विचारधारा

Workers 'hand' to the memorial monument | मंडलिकांच्या स्मारकाला कष्टकऱ्यांचा ‘हात’

मंडलिकांच्या स्मारकाला कष्टकऱ्यांचा ‘हात’

दत्तात्रय पाटील - म्हाकवे  कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलेले आणि राजकारणाच्या माध्यमातून बहुसंख्य लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी अहोरात्र धडपडणारे शेतकऱ्यांचे नेते दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे हमीदवाडा कारखाना कार्यस्थळावर भव्य-दिव्य स्मारक उभे करण्याचे ‘शिवधनुष्य’ कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनीच उचलले आहे. या स्मारकासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी शेतकरी कष्टातून पिकविलेल्या उसातून प्रतिटन २५ रु. प्रमाणे सलग दोन वर्षे कपात करून स्मारक उभारणीच्या रूपातून मंडलिकांचे आचार-विचार चिरकाल अबाधित ठेवणार आहेत. विशेष म्हणजे चिकोत्रा खोऱ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही सेनापती कापशी येथील रवींद्र पाटील या शेतकऱ्याने एकरी ७४ टन इतके उसाचे उत्पादन घेऊन कारखान्याकडून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले; परंतु या बक्षिसाची सात हजार इतकी असणारी रक्कम पाटील यांनी मंडलिकांच्या स्मारकाला देऊन निधी उभारणीला उत्स्फूर्तपणे सुरुवातच केली. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी प्रतिटन २५ रुपये सलग दोन वर्षे देण्याचा निर्धार करून स्मारक उभारणीला बळकटी दिली. १९९३ ते ९५ या काळात पाटबंधारे राज्यमंत्रिपद मिळताच मंडलिकांनी काळम्मावाडी धरणातील पाणी आदमापुराजवळील टाकी नाल्यातून वेदगंगा नदीमध्ये सोडण्याचे तसेच निढोरीतून सोनालीमार्गे म्हाकवेपर्यंत येणाऱ्या आणि बिद्री मार्गे बाचणी, शेंडूरकडे जाणाऱ्या कच्च्या कालव्यातून पाणी सोडले. प्रशासन याला तयार नसतानाही स्वत:च्या जबाबदारीवर हे पाणी सोडून कागलमधील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे महत्त्वपूर्ण काम मंडलिकांनी केले आहे. मंडलिकांच्या योगदानातूनच आम्ही आर्थिक समृद्ध झालो असून, त्यांच्या ऋणातून काहीअंशी मुक्त होण्यासाठी त्यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी निधी देणार असल्याचेही शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. दरम्यान, हमीदवाडा कारखान्याने गत हंगामातील उसाला राज्यात उच्चांकी प्रतिटन २६७५ रु. इतका दर दिला असून, उच्चांकी दराची परंपरा हा कारखाना जोपासणार आहे. सध्या या कारखान्याचा साखर उतारा १२.९४ टक्के इतका आहे. त्यामुळे एफआरपी सुमारे ३ हजार १३४ रु. इतकी होते. त्यातून तोडणी वाहतूक वजा जाता प्रतिटन २७०० रु. शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आगामी हंगामात पाच लाख टन ऊस गाळप होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे प्रतिटन २५ रु.प्रमाणे सव्वा कोटी रुपयांचा निधी यावर्षी आणि पुढील वर्षी सव्वा कोटीचा निधी जमा करून स्मारकाची उभारणी करण्याचा मानसही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मंडिलकांचे कार्य राज्यकर्त्यांबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रेरणा देणारे आहे. हमीदवाडा कारखाना हा मंडलिकांचे एक स्मारकच असून, तो नियोजनबद्ध, पारदर्शी चालविणे ही त्यांना श्रद्धांजलीच ठरणारी आहे. तसेच कारखाना कार्यस्थळावर स्मारक उभारणीसाठी शेतकऱ्यांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग म्हणजे मंडलिकांच्या कार्याची महती वाढविणारा आहे. - बंडोपंत चौगले-म्हाकवेकर, संचालक, सदासाखर

Web Title: Workers 'hand' to the memorial monument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.