‘अमित स्पिनिंग’च्या कामगारांचे उपोषण

By Admin | Updated: November 24, 2015 00:36 IST2015-11-24T00:36:05+5:302015-11-24T00:36:24+5:30

अन्यायाचा निषेध : सात महिन्यांपासून वेतन नाही

Workers' fast of 'Amit Spinning' | ‘अमित स्पिनिंग’च्या कामगारांचे उपोषण

‘अमित स्पिनिंग’च्या कामगारांचे उपोषण

कोल्हापूर : सांगवडे (ता. करवीर) येथील अमित स्पिनिंगमधील कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. तसेच कंपनीकडून मनमानी कारभार करीत कामगारांवर अन्याय केला जात आहे. याच्या निषेधार्थ बाजीराव यादव, दिलीप देसाई, आप्पासो सावंत या कामगारांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्याला इतर कामगारांनी पाठिंबा देत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.
सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी अमित स्पिनिंगमधील कामगार एकवटले. या ठिकाणी घोषणाबाजी करीत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. बाजीराव यादव, दिलीप देसाई, आप्पासो सावंत हे उपोषणाला बसले आहेत. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
या कारखान्यामधील कामगारांना गेले सात महिने वेतन देण्यात आलेले नाही. व्यवस्थापनाने कामगारांच्या प्रॉव्हिडंड फंडांचे पैसे भरलेले नाहीत. कामगारांच्या विम्याच्या हप्त्यांची रक्कम कंपनीकडून कपात केली; परंतु ते पैसे त्यांच्याकडून जमा करण्यात आलेले नाहीत. कामगारांची सहकारी सोसायटी असून, कामगारांचे कर्जाचे हप्तेही व्यवस्थापनाने सोसायटीला दिले नसल्यामुळे सोसायटीही अडचणीत आली आहे. अशा पद्धतीने व्यवस्थापनाने चालविलेल्या या कारभारामुळे कामगार सर्व बाजंूनी अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत कारखान्यात व्यवस्थापनाने कामासाठी कापूस उपलब्ध करून दिलेला नाही. यामुळे कामगारांवर एकप्रकारे मानसिक दबाव वाढविण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाकडून केला जात आहे.
कारखान्यामध्ये कामगारांनी जरी डोळे मिटले, तरी वरिष्ठ अधिकारी फोटो काढतात व कामगार झोपला असल्याचे चित्र रंगवून दोन दिवस निलंबनाची शिक्षा देतात.
अशा प्रकारे कामगारांचा मानसिक छळ करून व्यवस्थापन कामगारांवर दबाव वाढवीत आहे. कामगारांनी राजीनामे देऊन निघून जावे, असे व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले
जात आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Workers' fast of 'Amit Spinning'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.