ठेकेदारांनी टाकला कामावर बहिष्कार

By Admin | Updated: January 18, 2017 01:01 IST2017-01-18T01:01:54+5:302017-01-18T01:01:54+5:30

पावणेदोनशे कामे प्रलंबित : ई.पी.एफ. रजिस्ट्रेशन अटीमुळे उचलले पाऊल; निविदेला प्रतिसाद नाही

Workers boycott work | ठेकेदारांनी टाकला कामावर बहिष्कार

ठेकेदारांनी टाकला कामावर बहिष्कार


भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर
कामे करणे अत्यावश्यक असताना निधी नसल्याचे कारण सांगितले जाते आणि काही कामांसाठी निधी असतानाही ठेकेदारांकडून कामे पूर्ण केली जात नाहीत, अशा विचित्र संक्रमणातून वाटचाल करीत असताना महानगरपालिकेच्या प्रशासनासमोर सध्या एक नवीन संकट उभे राहिले आहे. कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी भरणार नाहीत, अशा ठेकेदारांना कामे दिली जाऊ नयेत, अशी अट भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने घातल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून १८० कामांची प्रक्रिया रखडली आहे. ठेकेदारांनी या जाचक अटीमुळे तीन वेळा फेरनिविदा प्रसिद्ध होऊनही प्रतिसाद न देता अघोषित बहिष्कार टाकल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.
कोल्हापूर शहरात छोटे रस्ते, गटारी, चॅनेल, पाईपलाईन, सांस्कृतिक भवन अशी कामे करण्यासाठी ६५ स्थानिक ठेकेदारांचे एक पॅनेल महानगरपालिकेकडे आहे. वर्षाकाठी प्रत्येक ठेकेदाराला २५ ते ३० लाखांची कामे दिली जातात. कामे छोटी असल्याने बाहेरगावाहून कोणी ठेकेदार या कामाच्या निविदा भरत नाही. स्थानिक ठेकेदारच ती करीत असतात; परंतु काही महिन्यांपूर्वी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने, जे ठेकेदार कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणार नाहीत, त्यांना कामाचे ठेके देऊ नयेत, असे महापालिका प्रशासनाला पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सर्व ठेकेदारांना तसे लेखी आदेश दिले. ई. पी. एफ. रजिस्ट्रेशन घेतले असेल तरच निविदा भराव्यात, असे आदेशात म्हटले आहे.
ई. पी. एफ. रजिस्ट्रेशन आणि महापालिका प्रशासनाच्या जाचक अटींमुळे ठेकेदारांनी गेल्या अडीच तीन महिन्यांत महापालिकेचे एकही टेंडर भरलेले नाही. प्रत्येकी ६०
कामांच्या तीन निविदा प्रसिद्ध झाल्या. त्यांना कोणीच प्रतिसाद दिला नाही. नंतर या निविदांना तीन वेळा
मुदतवाढ देण्यात आली. तरीही कोणीही निविदा भरलेल्या नाहीत. सुमारे १८० कामे त्यामुळे रखडली आहेत. अंदाजपत्रके तयार आहेत, निधीही आहे; पण ठेकेदारांनी
त्याकडे पाठ फिरविल्यामुळे सर्वच कामे गेल्या तीन महिन्यांपासून रखडली आहेत.

Web Title: Workers boycott work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.