कार्यकर्त्यांना ‘जागते रहो’चा सल्ला
By Admin | Updated: October 31, 2015 00:22 IST2015-10-31T00:21:14+5:302015-10-31T00:22:00+5:30
छुप्या प्रचारावर जोर : प्रतिष्ठेच्या लढाईतील आजचा दिवस महत्त्वाचा

कार्यकर्त्यांना ‘जागते रहो’चा सल्ला
एकनाथ पाटील -कोल्हापूर -महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी थंडावली... आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी हवेत विलीन झाल्या... आता फक्त राहिला तो छुपा प्रचार... प्रतिष्ठेच्या लढाईतला महत्त्वाचा अंतिम दिवस... शनिवार. त्यानंतर उद्या, रविवार (दि. १) मतदान... या पार्श्वभूमीचा अंदाज घेत अनेक घडामोडींची उलथापालथ होणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण येणार... गड जिंकायचाच म्हणून सर्वच उमेदवारांनी ‘गनिमी कावा’ पद्धत अवलंबली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रभागात कार्यकर्त्यांना तळ ठोकून बसण्याचे फर्मान काढले आहे. एका रात्रीत काहीही घडू शकते, याचा अंदाज घेत त्यांनी कार्यकर्त्यांना हाक दिली आहे, ‘जागते रहो... रात्र वैऱ्याची आहे.’
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने संपूर्ण शहर ढवळून निघाले. गल्ली-बोळांत लहानापासून वयोवृद्धांपर्यंत फक्त निवडणुकीचीच चर्चा ऐकायला मिळते. यंदाच्या निवडणुकीत तर महिला वर्ग आघाडीवर आहे. प्रचारफेऱ्या, कोपरा सभा, नेत्यांचे मेळावे, सभा, रॅलीने या निवडणुकीत वेगळाच रंग चढला आहे. प्रत्येक उमेदवार ईर्ष्येला पेटला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध भेटवस्तूंचे वाटप केले. जेवणावळींसह काही ठिकाणी पर्यटन सहलींही काढल्या होत्या. प्रचारासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पायांना भिंगरी बांधली आहे.
शहरात बावीस दिवसांच्या प्रचाराच्या रणधुमाळीचा शुक्रवारी शेवट झाला. राहिला फक्त एक दिवस. या दिवसातच महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता असल्याने उमेदवारांसह कार्यकर्ते डोळ्यांत तेल घालून रात्रीचा जागर घालत आहेत. कार्यकर्त्यांनी गल्लीबोळापासून ते चौकापर्यंत व दरवाजापासून ते स्वयंपाकघरापर्यंत वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी मोहीम राबविली आहे. कोण कुठे जातो, कोण कोणाला भेटतो, अनोळखी व्यक्ती भागात शिरतेय का? याकडे कार्यकर्ते करडी नजर ठेवून लपून-छपून कानोसा घेत आहेत.
उमेदवार फोनाफोनी करून कार्यकर्त्यांकडून वातावरणाची माहिती घेत आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला कुठेही वळवाप्रमाणे पैशांचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे भरती-ओहोटी येण्याची दाट शक्यता असल्याने उमेदवार सतर्क आहेत. प्रत्येकाने आपापल्या भागात फिल्डिंग लावली आहे. ‘गनिमी कावा’ कोठे वापरायचा यासाठी गुप्त बैठका घेतल्या जात आहेत. ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने विजयासाठी वाट्टेल ते करण्याचा, अगदी साम-दाम-दंड-भेद, आदींचा वापरही करण्याची उमेदवारांनी तयारी केली आहे.
पैजा रंगल्या : समर्थकांकडून देव पाण्यात
या निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर उतरले आहेत. भाजपने मात्र स्थानिक ‘ताराराणी’शी आघाडी केली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये चुरस आहे. साहेब व वहिनींच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत; तर काहींनी कुलस्वामीला अभिषेक घातले आहेत. महिलांनी उपवास व नवस बोलून दाखविले आहेत.
प्रचाराचा धुमधडाका
महानगरपालिका निवडणुकीत
८१ प्रभागांत प्रमुख पक्षांसह
५०६ उमेदवार रिंंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत शहरासह उपनगरात दीड हजार मेळावे-सभा, १२०० प्रचारफेऱ्या, १ हजार कोपरा सभांनी शहर दणाणून निघाले.