वसंतदादा स्मारकाचे काम अखेर मार्गी
By Admin | Updated: May 29, 2015 00:02 IST2015-05-28T23:44:09+5:302015-05-29T00:02:42+5:30
आजपासून काम सुरू : ३ कोटी ४७ लाख रुपये वर्ग; बांधकाम, सजावट होणार

वसंतदादा स्मारकाचे काम अखेर मार्गी
अंजर अथणीकर - सांगली -येथील स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाचे काम अखेर मार्गी लागले आहे. शुक्रवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असून, यासाठी ३ कोटी ४७ लाख रुपये वर्गही करण्यात आले आहेत. गेल्या सात वर्षांपासून याचे काम पूर्णपणे थांबले होते.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सांगलीत उचित स्मारक करण्यात यावे, या मागणीवरून स्टेशन चौकात त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याहस्ते या स्मारकाचे पंधरा वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. या स्मारकाची पायाभरणी झाल्यानंतर गणपती पंचायतनचे प्रमुख विजयसिंहराजे पटवर्धन व महापालिकेमध्ये या जागेवरून वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण नंतर तडजोडीने मिटवण्यात आले. तोपर्यंत स्मारकाच्या खर्चाचा निधी वाढला. यामुळे पुन्हा नव्याने निविदा काढून याचे काम सुरू करण्यात आले. मुळात तीन कोटींचे असणारे काम आता साडेआठ कोटींच्या घरात गेले आहे.
आघाडी शासनाने साडेतीन कोटी रुपये मंजूर करूनही तो निधी न आल्याने हे काम गेल्या सात वर्षांपासून रखडले होते. याबाबत तत्कालीन पालकमंत्र्यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या; मात्र काम सुरू झाले नाही. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुरुवारी अधिकाऱ्यांना स्मारकास भेट देण्याचे आदेश दिले. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्मारकास भेट दिली. शुक्रवारपासून स्मारकाभोवती पत्रे उभारण्यात येणार असून, प्रत्यक्षात १ जूनपासून बांधकाम व इतर अंतर्गत सजावटीच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.
स्मारकाची दुरवस्था
गेल्या सात वर्षांपासून स्मारकाचे काम रखडल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. छताचे पत्रे उचकटले असून, काही पत्रे निखळून पडले आहेत. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. स्मारकामध्ये कचऱ्याचा ढीग साचला आहे. पुतळ्याभोवतीही कचरा साचून राहिला आहे. फरशाही उचकटल्या आहेत. शुक्रवारपासून ही जागा बंदिस्त करण्यात येत आहे.
आता काय होणार?
स्मारकासाठी ३ कोटी ४७ लाख रुपये प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले आहेत. या तीन कोटींमधून अंतर्गत सजावट करण्यात येणार आहे. यामध्ये आर्ट गॅलरी उभारणे, फर्निचर, ध्वनियंत्रणा, लँडस्केप, दुरुस्ती, रंगकाम आदी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. उर्वरित ४७ लाख रुपयांमधून इलेक्ट्रिकल व्यवस्था करण्यात येणार आहे. या बांधकामासाठी ज्याने यापूर्वी ठेका घेतला आहे, त्याला हे काम देण्यात आले असून, त्याने नकार दिल्यास नवी निविदा काढून तात्काळ दुसऱ्या ठेकेदाराकडून या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. फेरनिविदेमुळे स्मारकांच्या कामाला पुन्हा विलंब होऊ शकतो. त्यासाठी फेरनिविदेत वेळ जाणार नाही, याची दक्षता घेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.