सोनवडे येथील नळपाणी पुरवठा योजनेचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:07+5:302021-02-05T07:06:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोनवडे : (ता. शाहूवाडी) येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप ...

सोनवडे येथील नळपाणी पुरवठा योजनेचे काम रखडले
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनवडे : (ता. शाहूवाडी) येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठेकदाराचा दुर्लक्षपणा व कामातील दिरंगाईमुळेच हे काम रखडले गेल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे.
सोनवडे गावासाठी कडवी नदीवरून पाणीपुरवठा करण्यासाठी २०१६ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुमारे एक कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. २०१७ मध्ये या योजनेच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली. संबंधित ठेकेदाराने सुरुवातीस थोडे फार काम केले. परंतु त्यांनतर या योजनेंतर्गत अनेक कामे अर्धवट अवस्थेत ठेवली आहेत. गावामध्ये अनेक ठिकाणी नवीन पाईप बसविण्यात आलेल्या नाहीत. तसेच गावातंर्गत येणाऱ्या शिंदेवाडी येथील १५ हजार लिटर्स क्षमतेच्या टाकीचेही काम अपूर्ण आहे. एका वर्षाची मुदत असणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेचे हे काम सुरू होऊन तीन वर्षे होऊन गेलीत, परंतु अद्यापही या योजनेचे काम पूर्णत्वाकडे गेलेले नाही. हे काम पूर्ण करण्यासंदर्भात ग्राम पाणीपुरवठा समितीच्या वतीने ठेकेदारास वारंवार सूचना देऊनही या योजनेच्या कामास गती मिळालेली नाही. उलट गेल्या दीड वर्षांपासून हा ठेकेदार गावाकडे फिरकलाच नसल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराविरुद्ध ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपूर्ण कामामुळे या योजनेचे भवितव्य अधांतरी राहिले असून, गावास पाणीटंचाईसारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जि. प. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या योजनेच्या कामात लक्ष घालून संबंधित ठेकेदारांकडून या योजनेचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
कोट....
या योजनेचे काम पूर्ण करण्यासंदर्भात संबंधित ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही संबंधित ठेकेदाराने या कामाच्या पूर्णत्वासाठी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराविरोधात जि. प.च्या अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रार केली आहे. परंतु जि.प.मधील काही अधिकारीच या ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पाणी योजनेचे काम रखडले गेले आहे. या योजनेचे काम त्वरित पूर्ण न झाल्यास सोनवडे ग्रामस्थांच्यावतीने जि. प. कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
विष्णू पाटील - माजी उपसभापती,
व अध्यक्ष ग्राम पाणीपुरवठा समिती सोनवडे