सांगली-कोल्हापूर मार्गाच्या कामाची लगीनघाई जोमात
By Admin | Updated: July 16, 2015 20:52 IST2015-07-16T20:52:06+5:302015-07-16T20:52:06+5:30
पावसाने ओढ दिल्याने कामाला गती : महामार्गावर वाहतूक कोंडी मात्र कायमच

सांगली-कोल्हापूर मार्गाच्या कामाची लगीनघाई जोमात
संतोष बामणे - जयसिंगपूर -पावसाने ओढ दिल्याने सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम आता वेगाच्या सुसाट्यात चालू असून आता महामार्ग लवकरच होणार अशी चिन्हे दिसत आहेत. मात्र, पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली तर हे काम रखडणार आहे. दरम्यान, तमदलगे-उदगाव बायपास रस्ता व अंकली-सांगली रस्त्याच्या कामाची लगीनघाई मोठ्या प्रमाणात सुरू
आहे.गेल्या दोन वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गावरील रस्त्याच्या कामाची वाऱ्यावरची वरात अशी गत झाली होती. मात्र, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन ३१ मे ची मुदत सुप्रीम कंपनीला दिली होती, पण त्यादरम्यान या रस्त्याचे काम होऊ शकले नाही. पाऊस नसल्याने आता मोठ्या जोमात काम सुरू असल्याचे चित्र महामार्गावर दिसत आहे.
उदगाव येथील बायपास रस्त्यावर गेल्या दीड वर्षापासून छोट्या पुुुुुलाचे काम चालू होते. ते आता पूर्णत्वास आले असून या मार्गावर चार मोठी वळणे होती. ही वळणे दूर करण्यासाठी नवीन जमीन संपादित करून सरळ मार्ग करण्यासाठी काम चालू आहे. येथील मार्गावर बाह्यवळण नसल्यामुळे महामार्ग सुसाट होणार आहे. तसेच तमदलगे, जयसिंगपूर, उदगाव पुलापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. मात्र, हा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र, वाहतूक कोंडीही नित्याचीच बनली आहे.
अंकली-सांगली या पाच किलोमीटरच्या अंतरावर आता रस्त्याचे काम सुरू झाले असून येत्या महिन्याभारात हे काम पूर्ण
होईल, असेच चित्र आहे. महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहनधारक हतबल झाले असून काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशाफलक, काम चालूचे फलक लावण्यात आलेले नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वी केलेले डांबरीकरण हे वाहनांच्या वाहतुकीसाठी गैरसोयीचे बनत आहे. गावामध्ये साईडपट्टीत मुरुम न टाकल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
गेल्या चार वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गावरील शिरोली, हालोंडी, हेरले, चोकाक,
अतिग्रे, हातक णंगले, मजले, तमदलगे, निमशिरगांव, जैनापूर, जयसिंगपूर, उदगाव, अंकली ते सांगलीपर्यंतच्या गावातील नागरिकांना रस्त्याच्या कामात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी काही गावांना शासनाशी भांडावे लागले होते. विविध अपघातात वाहनधारकांनी आपला जीवही गमावला आहे, पण महामार्ग पूर्ण झाल्यास या गावांना मोठी रोजगार प्राप्त होणार आहे व महामार्गालगत असलेल्या जमिनींना आज सोन्याचा भाव मिळाला आहे, हे मात्र नक्की.