पडळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम तालुक्यात सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:18+5:302021-07-03T04:16:18+5:30
यवलूज : पडळ (ता. पन्हाळा) येथील आरोग्य केंद्राचे काम तालुक्यात उत्तम प्रकारचे असल्याने या आरोग्यवर्धिनीमध्ये उपचारासाठी येणारे ...

पडळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम तालुक्यात सर्वोत्कृष्ट
यवलूज : पडळ (ता. पन्हाळा) येथील आरोग्य केंद्राचे काम तालुक्यात उत्तम प्रकारचे असल्याने या आरोग्यवर्धिनीमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांतून आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व सर्वच कर्मचाऱ्यांच्या नि:स्वार्थी व निस्सीम सेवेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
आरोग्य केंद्रांतर्गत १४ गावांतील लोकांना मोफत सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा दिली जाते. कोरोना महामारीच्या काळातही सातत्याने नागरिकांच्या आरोग्याचे हित जपत आरोग्य केंद्राचे कर्मचारी सेवा बजावत आहेत.
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव या आरोग्यवर्धिनी कार्यक्षेत्रातील गावात मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्याचे गांभीर्य ओळखून केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर तालुक्यात सर्वांत जास्त नागरिकांच्या रॅपिड अँटिजन टेस्ट व आरटीपीसीआर चाचण्या केल्या आहेत. याशिवाय सर्वच आरोग्य उपकेंदाअंतर्गत त्या- त्या गावातील नागरिकांना शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यातही आरोग्य केंद्राचे काम कौतुकास्पद आहे.
सध्या पडळ आरोग्य केंद्रात लसीचे डोस मागणीपेक्षा कमी येतात. त्यामुळे उपलब्ध क्षमतेनुसार लसीचे डोस देण्यात येतात. लसीकरण मोहिमेतही आग्रही राहून नागरिकांनी सहकार्य करावे. पन्हाळा तालुक्यात या आरोग्य केंद्राचे काम अतिशय चांगले आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी संयमाने व शिस्तीने लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी सौ. रूपाली भिसे यांनी नागरिकांना केले.