बहुमजली पार्किंगच्या कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:05+5:302020-12-05T04:54:05+5:30
कोल्हापूर : येथील अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीकरिता ताराबाई रोडवर बांधण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी बहुमजली वाहनतळाच्या कामास सुरुवात झाली. कोरोनाची ...

बहुमजली पार्किंगच्या कामास सुरुवात
कोल्हापूर : येथील अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीकरिता ताराबाई रोडवर बांधण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी बहुमजली वाहनतळाच्या कामास सुरुवात झाली. कोरोनाची साथ, लॉकडाऊन यामुळे या कामास कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही आठ महिने विलंब होत आहे. दरम्यान, ताराबाई रोडवरील महालक्ष्मी मार्केट तसेच अन्य केबिन हटविण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली.
अंबाबाई मंदिर परिसर विकास अंतर्गत राज्य सरकारकडून बहुमजली वाहनतळास नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून या वाहनतळाची उभारणी केली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात या कामाच्या कार्यारंभाचे आदेश मे. व्ही. के. पाटील यांना देण्यात आले. कामाला सुरुवात होत असतानाच जिल्ह्यात कोरोनाची साथ आली. त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आला. ताराबाई रोड परिसरातील महालक्ष्मी मार्केटमधील ७७ केबिन तसेच बाबुजमाल समोरील १० ते १२ केबिनधारकांची पर्यायी व्यवस्था करणेही बाकी होते. त्यामुळे काम थांबले होते.
दोन दिवसांपासून ठेकेदारांनी वाहनतळाचे काम सुरू केले आहे. महालक्ष्मी मार्केट येथील ७७ केबिनधारकांना कपिलतीर्थ मार्केट जागा तात्पुरती देण्यात आली आहे. त्याठिकाणी सर्व केबिनधारक स्थलांतर होत आहेत. काही केबिनधारक स्थलांतर होण्यास टाळाटाळ करत होते. म्हणून गुरुवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मालमत्ता अधिकारी सचिन जाधव, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी पंडित पोवार यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व केबिनधारकांनी तेथून स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या. या केबिनधारकांना नियोजित वाहनतळ इमारतीत जागा देण्यात येणार आहे. आज, शुक्रवारपर्यंत सर्व केबिनधारक स्थलांतर होतील, असे सांगण्यात आले.