मणिकर्णिका कुंडाचे काम आठ दिवसांपासून थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST2021-03-31T04:24:17+5:302021-03-31T04:24:17+5:30
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम संपल्याने कॉन्ट्रॅक्टरने गेल्या आठ दिवसांपासून काम थांबवले आहे. माऊली लॉजचे ...

मणिकर्णिका कुंडाचे काम आठ दिवसांपासून थांबले
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम संपल्याने कॉन्ट्रॅक्टरने गेल्या आठ दिवसांपासून काम थांबवले आहे. माऊली लॉजचे अतिक्रमण असलेली पश्चिमेकडील बाजू सोडली, तर कुंडाच्या अन्य भागातील खुदाई पूर्ण झाली आहे. लॉजचे प्रकरण उच्च न्यायालयात असून, त्याची सुनावणी २३ एप्रिलला होणार आहे. दुसरीकडे ज्यांच्या मान्यतेमुळे हे अतिक्रमण झाले, ती महापालिका मात्र या प्रकरणापासून नामानिराळी राहिली आहे.
अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणिकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम गेल्या दहा महिन्यांपासून सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वीच या कुंडाचा तळ लागला असून, आता दत्त मंदिराच्या शेजारी कुंडात उतरण्यासाठीच्या पायऱ्याही खुल्या झाल्या आहेत. कुंडाच्या आतील सर्व खुदाई आता संपली आहे. केवळ माऊली लॉजचे अतिक्रमण असलेल्या ठिकाणची पश्चिमेकडील खुदाई व्हायची बाकी आहे. हे काम आणखी चार पाच दिवसांचे आहे. पाऊस पडला की तेथील मातीची कमकुवत भिंत ढासळून थेट खुल्या झालेल्या कुंडात पडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कुंड मुजण्याची भीती आहे. असे झाले,तर परत कुंडातील माती खुदाई करुन काढावी लागणार आहे.
---
संवर्धन थांबले...धोकादायक स्थिती
खुदाईनंतरचा पुढचा टप्पा असतो जतन व संवर्धनाचा. मात्र माऊली लॉजकडील बाजूची खुदाई होत नाही तोपर्यंत जतन संवर्धनाचे काम सुरू करता येत नाही. तेथील मातीची भिंत आता धोकादायक स्थितीत असून, कधीही पडण्याची शक्यता आहे. येथे कुंडात जाण्यासाठीच्या पायऱ्या आहेत. या भागाची खुदाई होत नाही तोपर्यंत जतन संवर्धनाचा आराखडा तयार करता येत नाही.
---
पाणी झाले हिरवे
कुंडात पाण्याचे १६ जिवंत झरे होते, त्यापैकी दोन झरे जिवंत झाले आहेत. कुंडात महापालिकेच्या गटारीचे पाणी मिसळत असल्याने पाणी हिरवे झाले आहे. हे पाणी थांबवून कुंडातील पाण्याचा पाच सहावेळा उपसा करावा लागणार आहे. त्याशिवाय स्वच्छ पाण्याचे झरे खुले होणार नाहीत. पण या सगळ्यासाठी आता माऊली लॉजबाबत काय निकाल लागतो, याची वाट पाहावी लागणार आहे.
--
फोटो नं ३००३२०२१-कोल-मणिकर्णिका०१ ,०२
ओळ : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडाचे माऊली लॉजखालील बाजू वगळता अन्य खुदाईचे काम संपले आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून कॉन्ट्रॅक्टरने काम थांबवले असून, ड्रेनेजमुळे कुंडातील पाणी हिरवे झाले आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--