शिवरायांच्या विचारातूनच मालोजीराजेंचे कार्य
By Admin | Updated: July 7, 2017 23:20 IST2017-07-07T23:20:35+5:302017-07-07T23:20:35+5:30
शिवरायांच्या विचारातूनच मालोजीराजेंचे कार्य

शिवरायांच्या विचारातूनच मालोजीराजेंचे कार्य
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणाचे राज्य केले. रयतेच्या हिताचे राज्य केले. लोक त्यांना भोसले यांचे नाही तर रयतेचे राज्य म्हणत असत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊनच श्रीमंत मालोजीराजेंनी काम केले, म्हणून तेही रयतेचे राजे झाले,’ असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले.
फलटण येथे शुक्रवारी सायंकाळी श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाच्या वतीने मानाचा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार खासदार शरद पवार यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार, विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोइटे, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सुनील माने, नगराध्यक्षा नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, पंचायत समितीचे सभापती रेश्मा भोसले, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. विजयराव बोरावके, सुभाष शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘बारामती तालुक्यातील मालेगाव कारखाना व छत्रपती कारखाना, भवानीनगर या दोन्ही कारखान्यांच्या उभारणीत मालोजीराजेंचे मोठे योगदान होते. त्यांनी नेहमी विकासकामाला प्राधान्य दिले. मुंबई द्विभाषिक राज्य होते. तेव्हाही आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही त्यांचे मोठे योगदान होते. अवघड काळातही यशवंतराव चव्हाण यांना त्यांनी साथ दिली. देशाला स्वातंत्र मिळाले तेव्हा अनेक संस्थांनिकांचे वेगवेगळे विचार चालले होते. संस्थान विलीन करण्यास काहीचा विरोध होता. मात्र मालोजीराजेंनी सर्वप्रथम फलटण संस्थान विलीन करून सर्व रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली. त्यांचे राज्य जनतेच्या हिताचे होते. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार माझा गौरव समजतो.’
रामराजे म्हणाले, ‘माझ्या आयुष्यातील आदरस्थानी शरद पवार असून, १९९१ पासून आम्ही राजकारण करतोय. लोकांनी नेहमी आम्हाला साथ दिली, प्रेम दिले हे विसरून चालणार नाही. लोकांप्रमाणेच शरद पवारांनीही दिशा दाखविण्याचे काम केले. आजोबांनी घालून दिलेल्या आदर्शावर आमची वाटचाल सुरू असून, त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाल्याचे समाधान वाटते.’ संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रभाकर पवार यांनी आभार मानले.
‘महावितरण’चा धक्का
फलटणच्या महावितरणचा नेहमीच्या भोंगळ कारभाराची चुणूक शुक्रवारच्या कार्यक्रमात दिसून आली. खासदार शरद पवार भाषणाला उभे राहताच वीज गायब झाली. यावेळी उपस्थितांनी मोबाईल बॅटरीचा प्रकाश लावला. दोन मिनिटांत पुन्हा वीज आली. मात्र, वीजवितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
सासरवाडीतून सत्कार
मी विचार करतोय, बारामतीकरांचा सत्कार फलटणकर करता. मी माळेवाडीला माहेर तर फलटणला सासर समजतो. त्यामुळे एकप्रकारे हा सासरच्या माणसांकडून माहेरच्या लोकांचा केलेला सत्कारच आहे, अशी मिश्कील टिप्पणी शरद पवार यांनी यावेळी केली.