पानसरेंच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी मेहनत घ्या
By Admin | Updated: March 12, 2015 23:50 IST2015-03-12T23:27:28+5:302015-03-12T23:50:59+5:30
रितेशकुमार यांच्या तपास अधिकाऱ्यांना सूचना

पानसरेंच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी मेहनत घ्या
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर दोन पिस्तुलांतून पाच गोळ्या झाडल्या गेल्याचे फॉरेन्सिक लॅबने केलेल्या तपासणी अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे मारेकरी सराईत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस रेकॉर्डवरील सराईतांची चौकशी करा, पानसरेंच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी मेहनत घ्या, अशा शब्दांत विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी तपास अधिकाऱ्यांना सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले. पानसरे हत्येच्या तपासाबाबत गुरुवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी बैठक घेतली. बैठकीसपोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह २५ विशेष टीमचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रितेशकुमार यांनी तपास योग्य दिशेने सुरू आहे; परंतु हाती ठोस पुरावा नाही. वरिष्ठ पातळीवरून रोज विचारणा होत आहे. त्यामुळे मारेकऱ्यांना पकडण्यासाठी मेहनत घ्या, अशा शब्दांत रितेशकुमार यांनी तपास अधिकाऱ्यांना सुनावले. (प्रतिनिधी)